कोल्हापूर , दि. १६ : गत आठवड्याच्या तुलनेत भाजीपाला मार्केटमध्ये फारसा चढउतार नसला तरी टोमॅटो, फ्लॉवरच्या आवकेत थोडी वाढ झाली आहे. कोथिंबिरीची आवक थोडी वाढल्याने घाऊक बाजारात तिच्या दरात पेंढीमागे पाच रुपयांची घसरण झाली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर डाळींसह कडधान्याचे मार्केट स्थिर असून, घाऊक बाजारात साखरेच्या दरात थोडी घसरण झाली आहे. फळबाजारात विविध फळांची रेलचेल दिसत असून सीताफळांची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
परतीच्या पावसाचा परिणाम भाजीपाला मार्केटवरपरतीच्या पावसाने सगळीकडे धुमाकूळ घातल्याने त्याचा कमी-अधिक परिणाम भाजीपाला मार्केटवर दिसत आहे. परजिल्ह्यांतून भाजीपाल्याची आवक चांगली असली तरी स्थानिक आवक कमी झाली आहे. ओली मिरची, वरणा, दोडका, श्रावणघेवडा या प्रमुख भाज्यांची आवक गत आठवड्याच्या तुलनेत कमी झाली आहे. मात्र टोमॅटो, फ्लॉवरची आवक काहीशी वाढली आहे.
गेले आठवड्यात किरकोळ बाजारात कोथिंबीर २५ ते ३० रुपये पेंढीपर्यंत दर होता. या आठवड्यात रोज २६ हजार पेंढ्यांची आवक सुरू असल्याने घाऊक बाजारात दरात थोडी घसरण होऊन सरासरी १५ रुपये पेंढीचा दर राहिला आहे. पावसामुळे ओल्या भुईमूग शेंगांची आवक अपेक्षित नाही. बाजारात मुळा दाखल झाला असून वीस रुपयांना तीन मुळे असा दर राहिला आहे. कांदापातीची आवक थोडी वाढल्याने दरात घसरण झाली असून मेथी, पालक, पोकळ्याचे दर मात्र स्थिर आहेत.
दिवाळीमुळे कडधान्य मार्केटमध्ये रेलचेल असली तरी दर स्थिर राहिले आहेत. किरकोळ बाजारात हरभराडाळ ७५, तूरडाळ ७२, मूग व मूगडाळ ७२ रुपये प्रतिकिलो आहे. सरकी तेल ७८ रुपये तर साखर ४० रुपयांवर स्थिर आहे. घाऊक बाजारात मात्र साखरेच्या दरात थोडी घसरण झाली आहे. फळ मार्केटमध्ये मोसंबी, चिक्कू, सफरचंद, डाळींब, सीताफळांची रेलचेल दिसत आहे. गेले आठवड्याच्या तुलनेत सीताफळाची आवक वाढली असून, बेळगावसह कर्नाटक भागातून चिक्कूची आवक झाली आहे. पिवळ्याधमक पपईची आवकही चांगली आहे.कांदा-बटाटा स्थिर!कांदा-बटाट्यांची आवक स्थिर राहिल्याने गत आठवड्याच्या तुलनेत दरांत फारसा चढउतार झालेला नाही. घाऊक बाजारात कांदा सरासरी २०, तर बटाटा १० रुपये किलो पर्यंत राहिला आहे.गुळाची आवक मंदावलीपरतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील गुर्ऱ्हाळघरे अडचणीत आली आहेत. आॅक्टोबर महिना निम्मा गेला तरी पाऊस पाठ सोडत नसल्याने पेच निर्माण झाला असून, बाजार समितीत गुळाची आवक मंदावली आहे.