येथील ग्रामपंचायत तसेच कोरोना नियंत्रण समितीने कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या कडक नियमावली अंतर्गत दोन वेगवेगळ्या दिवशी भरणारा आठवडी बाजार बंद केला. पण एकीकडे सद्य:स्थितीत शंभरीपार गेलेली रुग्णसंख्या चिंतेची बनली असताना मात्र गावात दररोजचाच बाजार भरू लागल्याने ग्रामपंचायतीची विक्रेत्यांपासून बाजारकर्त्यांसमोर काही मात्रा चालेना, असे चित्र दिसून येत असून नित्य बाजार ग्रामपंचायतीची डोकेदुखी बनला आहे.
ग्रामपंचायतीने कोरोना नियंत्रण समितीच्या सहकार्याने गावात कोरोना नियंत्रणासाठी सर्व आघाड्यांवर कडक नियमांची अंमलबजावणी केल्याने गत आठवड्यापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या अगदी पन्नाशीच्या आत राहिली. तथापि या आठवड्यात मात्र कोरोना बाधितांचा आकडा शंभरीपार गेल्याने नागरिकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे.
वेळोवेळी शासन अथवा ग्रामपंचायतीने पुकारलेल्या बंदला दुकानदार,व्यापारी, विक्रेते तसेच नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.तथापि सकाळी ७ते११ वाजेपर्यंत फिरून भाजीपाला विक्रीची परवानगी असताना दीपक चौक तसेच बाजारपेठेत दररोजच ठाण मांडून बसणाऱ्या काही विक्रेत्यांमुळे एकेक करून अन्य फळे, भाजीपाला विक्रेते तसेच शेतकरीही बाजारात भाजीपाला विक्री करू लागल्याने बाजारकर्त्यांचीही गर्दी वाढू लागली आहे.यामुळे ग्रामपंचायतीची डोकेदुखी झाली असून कोरोना नियंत्रणासाठी सर्व आघाड्यांवर झटणाऱ्या ग्रामपंचायतीसमोर भाजीपाला विक्रेते तसेच बाजारकर्त्यांमुळे बाजारात होणाऱ्या नित्याच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. ग्रामपंचायतीने प्रसंगी पोलिसांची मदत घेऊन दररोजचा बाजार बंद करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.