आजरा : आजऱ्याचा आठवडी बाजार शुक्रवारीच भरविला जाईल. १८ डिसेंबरपासून शुक्रवारचा बाजार सुरू राहील, असा निर्णय आजरा नगरपंचायतीच्या मासिक सभेत घेण्यात आला. बांधकाम परवाने वेळेवर मिळत नाहीत. मंजूर झालेली कामे होत नाहीत. चुकीच्या पद्धतीने गटारींचे बांधकाम या विषयावर खडाजंगी चर्चा झाली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी होत्या.
राष्ट्रीयीकृत बँकेतून चांगली सेवा मिळत नसल्याने आयडीबीआय किंवा कोकण विदर्भ बँकेत नगरपंचायतीची खाती उघडावीत, गांधीनगरमधील सार्वजनिक शौचालयाची जागा बदलावी, महिन्याच्या सभेला सर्व अधिकाऱ्यांना उपस्थित ठेवावे, असे सांगण्यात आले.
बांधकाम परवान्यासाठी सहा महिने नागरिकांना फेऱ्या माराव्या लागतात. मग चार इंजिनिअरांच्या काय उपयोग? असा सवाल उपनगराध्यक्ष विलास नाईक यांनी केला.
सहा महिन्यांत दिलेले बांधकाम परवाने व त्यांचा हिशेब सांगा, अशी मागणी संभाजी पाटील यांनी केली. दोनऐवजी चार इंजिनिअरांची निवड करा; पण नागरिकांची वेळेत कामे पूर्ण करा, असे अशोक चराटी यांनी सुचविले. नगरसेवकांच्या कामांना नियम दाखविता; मग लेखापरीक्षणास आक्षेप का? असा सवाल किरण कांबळे यांनी विचारला.
वाहन पार्किंगबाबत रस्त्यावर पट्टे मारले आहेत. चारचाकी वाहनांसाठी जनावरांच्या बाजाराची जागा, उर्दू शाळेचा परिसर, पंचायत समितीसमोर, भुदरगड पतसंस्थेशेजारी व्यवस्था केली आहे. त्याचे सर्वांनी पालन करावे, असे मुख्याधिकारी अजिंक्य पाटील यांनी सुचविले. तुळजाभवानी कॉलनीतील गटार तोडली आहे. ती ठेकेदार बांधणार की नगरपंचायत? असा सवाल धनाजी पारपोलकर यांनी केला.
मासिक सभेत कामांच्या मंजुरीचा ठराव होतो. मग कामे का होत नाहीत, असा सवाल आनंदा कुंभार, संजीवनी सावंत, धनाजी पारपोलकर यांनी केला. लेखापरीक्षकांच्या अहवालाचे वाचन करावे, अशी मागणी शुभदा जोशी यांनी केली.
सभेतील चर्चेत नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, अभिषेक शिंपी यांसह सदस्यांनी सहभाग घेतला.
---------------------------
* माझे नाव बदनाम करू नका. - मुख्याधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांना दम; पाणीपुरवठ्यासाठी टँकर खरेदी करणेस मंजुरी.
* सौरऊर्जेवर स्ट्रीट लाईट व पाणीपुरवठ्याची व्यवस्था करणार.
* ग्रामदैवत रवळनाथ देवालयाला ‘ब’ वर्ग दर्जा मिळावा.
* शहरातील सर्व रस्ते नऊ मीटरचे करण्याची मागणी.
* चारचाकी वाहनांना सकाळी १० ते ५ या वेळेत बाजारपेठेत प्रवेश बंद.