कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने लॉकडाऊन काळात नागरिकांना घरबसल्या भाजीपाला मिळण्याकरिता फेसबुकवर भाजी विक्रेत्यांची नावे, मोबाईल क्रमांक दिले असले, तरी प्रत्यक्षात मार्केट यार्डातील घाऊक बाजार बंद असल्याने भाजी विक्रेते तरी भाजी घरपोहोच कशी देणार हा प्रश्न विचारला जात आहे.
लॉकडाऊन काळात नागरिकांची गैरसोय व्हायला नको म्हणून महानगरपालिका प्रशासनाने फोनवर घरपोहोच भाजीपाला मागवा असे आवाहन केले होते. शहर अभियंता नारायण भोसले, इस्टेट अधिकारी सचिन भोसले, अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख पंडित पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सुमारे अडीचशे भाजी विक्रेत्यांची यादी तयार करून त्यांची नावे, फोन नंबर्स दिले आहेत.
महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांकरिता केलेली सोय ही चांगलीच आहे, परंतु सोमवारी एक प्रमुख अडचण लक्षात आली. विक्रेत्यांनी ही अडचण महापालिका अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. बाजार समितीने मार्केट यार्डातील घाऊक भाजीचे सौदे आठ दिवस बंद ठेवले आहेत. तसेच महाराष्ट्र - कर्नाटक सीमा कर्नाटक सरकारने बंद केली आहे.
त्यामुळे घटप्रभा तसेच कर्नाटकच्या अन्य भागातून येणाऱ्या भाजीपाल्याची आवक बंद झाली आहे. जर मार्केट यार्डातच भाजी येणार नसेल आणि शहरातील किरकोळ विक्रेत्यांना भाजी मिळणार नसेल तर मग शहरात फोनवर भाजी कशी देणार, असा प्रश्न विक्रेत्यांकडून विचारला जात आहे.
लॉकडाऊन होणार असल्याचे माहीत होते, त्यामुळे नागरिकांनी आठ दिवस पुरेल एवढी भाजी खरेदी करून ठेवली आहे; पण आणखी एक - दोन दिवसांनी नागरिकांना भाजी पाहिजे असेल तर ती मिळणार नाही. लॉकडाऊन आणखी वाढला तर मात्र बाहेरच्या जिल्ह्यातून येणाऱ्या भाजीकरिता विशेष सोय करावी लागणार आहे.