कोल्हापूर : कोण पडणार आणि कोण येणार याची खात्री कुणीच देऊ शकत नाही; पण या निवडणुकीत विजय कोणाचाही होवो, काहींचा फायदा नक्कीच होणार आहे. त्यातलेच एक म्हणजे गुलाल आणि फटाके विक्रेते. विजयाचे प्रतीक मानल्या जाणार्या गुलाल आणि फटाक्यांना मतमोजणीदिवशी मोठी मागणी असते. त्यामुळेच शहरातील दुकाने गुलालाने गुलाबी झाली आहेत; तर काही फटाक्यांच्या माळांनी सजली आहेत. निवडणुकीतील विजयानंतर आनंदोत्सव साजरा करण्यासाठी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी केली जाते. त्यामुळे निवडणुकीनंतर या दोन्ही वस्तूंना मोठी मागणी असते. गुलालाचा वापर हिंदू लोक लग्नकार्यावेळी, होळीच्या सणात व इतर मंगलप्रसंगी करतात. गुलालाला कोल्हापुरातील जोतिबा मंदिर येथे मोठ्या प्रमाणात मागणी आहे. हा गुलाल शहरात मुख्यत्वेकरून सोलापूर येथील केम, कुंडल व मुंबई तांदळाच्या किंवा शिरगोळ्याच्या पिठापासून गुलाल तयार करतात. खडीपासून मध्यम प्रतीचा गुलाल होतो व शाडूपासून केलेला गुलाल अगदी कमी प्रतीचा समजला जातो. तांदळाचा गुलाल केल्यास महाग पडतो म्हणून खडी वगैरे इतर पदार्थांपासून गुलाल तयार केला जातो. गुलालामध्ये हलका गुलाल व जाड गुलाल असे दोन प्रकार आहेत. हलक्या गुलालाचा दर जास्त असतो; तर जाड गुलालाचा दर कमी आहे. ५० रुपये प्रतिकिलोपासून ८० रुपये किलोपर्यंत गुलालाचे दर आहेत. फटाक्यांच्या माळांना मागणी आपल्याकडे गणेशोत्सव, दिवाळी, लग्नसराई, मंगलमय प्रसंगी आणि निवडणुकीतील विजयानंतर विशेष करून फटाके वाजविले जातात. अन्य प्रसंगी आकाशातील फॅन्सी आतषबाजीच्या फटाक्यांना जास्त मागणी असते. मात्र, निवडणुकीचा जल्लोष साजरा करण्यासाठी फक्त फटाक्यांच्या माळांना मागणी असते. एक हजार ते दहा हजार फटाक्यांची माळ असे या माळेचे प्रकार आहेत. (प्रतिनिधी)
विजयोत्सवासाठी बाजारपेठा झाल्या सज्ज निकालानंतरचा जल्लोष : गुलाल, फटाका विक्रीसाठी दुकाने थाटली
By admin | Published: May 16, 2014 12:39 AM