कोल्हापूर : जगभरात प्रेमाचं प्रतीक म्हणून ज्या दिवसाकडे पाहिले जाते असा तरुणाईला हवाहवासा वाटणारा व्हॅलेंटाइन डे रविवारी साजरा होत आहे. यानिमित्त मनाला भिडणारी भेटकार्डे, गळ्यातील पेडंट, चाॅकलेट, हार्टशेफ किचन, कपल वाॅच, टेडी, फोटो फ्रेम अशा एक ना अनेक वस्तूंची रेलचेल सध्या बाजारात दिसत असून, बाजारपेठा फुलल्या आहेत.
कोरोनानंतर प्रथमच जगभरातील प्रेमिकांसाठी १४ फेब्रुवारी हा दिवस एक पर्वणी असून, एकमेकांबद्दल प्रेमभावना व्यक्त करण्याचा हा दिवस मानला जातो. या दिवशी एकमेकांना गुलाबपुष्प, भेटवस्तू, शुभेच्छा पत्रे आदी वस्तू भेट देऊन प्रेमी आपले प्रेम व्यक्त करतात. यानिमित्त प्रेमांचं प्रतीक असलेले गुलाब बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आले असून, त्याची किंमतही १० ते २५ रुपयांपर्यंत प्रती नग पोहोचली आहे. यंदा व्हॅलेंटाइन डे च्या निमित्ताने खास तयार करण्यात आलेली ज्वेलरी, ब्रेसलेट, नेकलेस आदी दागिने, फोटो फ्रेम कपल स्टॅच्यू, एलईडी फोटो फ्रेम, कपल वाॅचेस, वाॅलेट, चाॅकलेट, वेगवेगळ्या आकारातील टेडीबेअर, बाॅटल टाइप टेडी, काचेच्या चंबूतील आकर्षक कपल स्टॅच्यू, गुलाब, हृदयाचा आकार असलेले दिवे, कँडलला चांगली मागणी आहे. आपल्या मनातल्या भावनांशी जुळणारा मजकूर असलेली शुभेच्छा पत्रे, किचेन्स आदींचा शोध घेणारी तरुणाईची नजर भिरभिरताना दिसत होती.
लाल रंग हा प्रेमाचा रंग ओळखला जातो. त्यामुळे अशा वस्तू विक्री करणारी दुकाने लाल रंगात न्हाऊन निघाली होती. वस्तूही लाल रंगाच्या आवरणात दिल्या जात होत्या.
सोशल मीडियावरून कविता अन् संदेशाची भाऊगर्दी
प्रेम म्हणजे शब्द नसणं, खूप काही बोलायचं होतं. सारं मनातच राहिलं..., विंदा करंदीकर यांची प्रेमावर कविता करायला कुणावर तरी प्रेम करावे लागते, त्याला सांगितले नसले तरी मनातून प्रेम अनुभवावेच लागते, तर कवी कुसुमाग्रज यांच्या कवितेतील प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत जाणं. क्षण एक पुरे प्रेमाचा आदी कवितांना सोशल मीडियावरून बहर आला होता. सोबत इंग्रजी संदेशाची देवाण-घेवाणीची जणू भाऊगर्दीच झाली होती.