कोल्हापूर : नाताळ सण येत्या रविवारी होत आहे. त्यानिमित्ताने कोल्हापुरातील बाजारपेठा सजल्या आहेत. ख्रिसमस ट्री, जिंगल बेल, आकाशदिवे, टोपी, छोटे सांताक्लॉज बाजारात विकण्यासाठी आले आहेत. नाताळसाठी कोल्हापुरातील सर्व चर्चवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ख्रिस्त जन्मोत्सव आणि नूतन वर्षारंभाच्या कार्यक्रमांसाठी कोल्हापूरकर सज्ज झाले आहे.नाताळसाठी कोल्हापुरातील वायल्डर मेमोरियल चर्चमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ४ डिसेंबरपासून सकाळी ८ वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत संडे स्कूल रॅली, इंग्रजी उपासना, मराठी उपासना, ख्रिसमस फेस्टिव्हल, विविध वस्तूंचे प्रदर्शन, गीत ख्रिस्तायन, कॅन्डल नाईट सर्व्हिस व गृहोत्सव सप्ताह, महिला मंडळ कार्यक्रम, टॅफ्टी कार्यक्रम, शकायना व एस्तेर पॅटन गर्ल्स हायस्कूलचा कार्यक्रम, क्वायर कार्यक्रम, सी. ई. कार्यक्रम, मदत कमिटीचा कार्यक्रम, जॉय ऑफ गिव्हिंग, बायबल क्विझ, मराठी गीत स्पर्धा, निबंध स्पर्धा, भजन, प्रीती भोजन असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.वायल्डर मेमोरियल चर्च, शहर उपासना मंदिर, कम्युनिटी हॉल, एस्तेर पॅटन हायस्कूल, गर्ल्स होस्टेल, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, पंचगंगा हॉस्पिटल, सीपीआर हॉस्पिटल, आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलसह, कळंबा कारागृह, लक्षतीर्थ वसाहत, शिंगणापूर, घरपण, कोडोली, पाडळी, शिरोली, कुडित्रे, कोपार्डे, नागाव, बाचणी, देवाळे, खुपिरे याठिकाणी उपासना सुरू आहे.
कोल्हापुरातील वायल्डर मेमोरियल चर्चबरोबरच ब्रह्मपुरीतील पवित्र सुवार्तिकाचे मंदिर, ऑल सेंटस चर्च, होलिक्रॉस चर्च, सेव्हंथ डे चर्च, विक्रमनगर येथील ख्रिस्ती समाज मंदिरासमोर धार्मिक पुस्तके, सीडी, कॅलेंडर्स, वचनांचे फलक, स्टीकर्स, ख्रिसमस कार्डस यांची विक्री सुरू आहे.
बाजारपेठा सज्ज
याशिवाय कोल्हापुरातील पापाची तिकटी, राजारामपुरी, महाद्वार रोड परिसरातील दुकानांमध्ये नाताळसाठी विविध वस्तू आकर्षक पद्धतीने मांडल्या आहेत. शहरातील सर्व मॉल्स आणि दुकानांतून ख्रिसमस ट्री, सांताक्लॉज, जिंगल बेल्स, चांदण्या, सांताचे शर्ट, टोप्या, कपडे, रंगीबेरंगी मेणबत्या यांची विक्री सुरू आहे.कुकीज, चॉकलेट, केक्सना मागणीनाताळमध्ये पाहुणे, नातेवाईक यांना भेट देण्यासाठी वेगवेगळ्या आकारातील आणि स्वादाचे कुकीज, चॉकलेट, केक्स, मिठाई, फराळ, गोड पदार्थ यांना बेकरी, दुकानांमध्ये मोठी मागणी आहे.