इचलकरंजी : कोरोची (हातकणंगले) येथे एका विवाहितेने पंख्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. कविता प्रकाश इंगळे (रा. गोलघुमट कॉलनी, कोरोची) असे तिचे नाव आहे. प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी पत्नीने सोडचिठ्ठी द्यावी म्हणून पतीकडून होणाऱ्या धमकी व मारहाणीच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याची तक्रार मुलगा अजय प्रकाश इंगळे याने दिली आहे.आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रकाश शंकर इंगळे (रा. कोरोची) व अश्विनी उमेश भोसले (रा. कबनूर) या दोघा जणांवर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रकाश हा पत्नी कविता हिला मी अश्विनीसोबत लग्न करणार आहे, तू मला सोडचिठ्ठी दे असे म्हणून नेहमी मारहाण करत होता. तसेच तू सोडचिठ्ठी दिली नाहीस तर तुझ्या मुलाला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देऊन मानसिक त्रास देत होता. त्यानंतर दि. १७ डिसेंबर २०२२ रोजी म्हसोबा मंदिर शहापूर येथे अश्विनीने प्रकाशला सोडचिठ्ठी द्यावी म्हणून कविताला मारहाण करत धमकावले आणि बहीण सोनाली हिलाही धमकी दिली होती. या त्रासास कंटाळून आई कविता हिने मंगळवारी आत्महत्या केल्याचे मुलगा अजय याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
kolhapur crime: प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी मागितली सोडचिठ्ठी, पत्नीने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 1:34 PM