दीपक जाधव
कोल्हापूर : पोलीस मुख्यालयसमोरील उद्यानात पोलीस दलाच्या वतीने शहीद स्तंभ उभारण्यात येणार आहे. याशिवाय उद्यानाची दुरुस्ती व उद्यानातील ३०३ फूट उंचीचा ध्वजही फडकविण्यात येणार आहे.२१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाख येथे चीनच्या सैनिकासोबत लढताना केंद्रीय राखीव दलाच्या दहा जवानांनी प्राणाची आहुती दिली होती. त्यांच्या स्मृती चिरंतन राहव्या यासाठी २१ ऑक्टोबर हा दिवस देशभर पोलीस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो. या दिवशी कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्यावतीने पोलीस कवायत मैदान येथे तात्पुरत्या स्वरुपात स्तंभ उभारुन शहीद दिन कवायत होते. यासाठी कायमस्वरूपी शहीद स्तंभ असावा अशी संकल्पाना पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची होती.त्यातून तसा प्रस्ताव पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे देण्यात आला होता. त्याला त्यांनी मान्यता दिल्याने या शहीद स्तंभाचे काम सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, उद्यानात असणारा राज्यातील दोन नंबरचा सर्वांत उंच ध्वज सन २०१९ पासून पुली तुटल्याने फडकवला जात नाही. सध्या ती पुली बसवून ध्वजही फडकावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. उद्यानातील म्युझिक कारंजा, रंगीत कारंजा तसेच लाॅन लहान मुलांची खेळणी, रंगीत लायटिंग व रंगरंगोटीची कामे करण्यात येत असून लवकरच पोलीस उद्यानही खुले होणार आहे.
उद्यानाचा वापर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी
सध्या उद्यानातील खालील बाजू ही वापराविना पडून आहे. तिथे आता लाॅन तयार करण्यात येत असून उद्यानातील दोन्ही बाजूस लाॅन करून पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मुलांचे बारसे, जावळ, वाढदिवस अशा छोट्या कार्यक्रमांसाठी उद्यानाचा वापर करण्यात येणार आहे.
२१ ऑक्टोबर या पोलीस शहीद दिनावेळी मानवंदनेसाठी कायमस्वरूपी शहीद स्तंभ असणे गरजेच आहे. त्यामुळे पोलीस उद्यानातील रिकाम्या जागी सध्या शहीद स्तंभ उभारण्यात येत आहे. -शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक.