खोची: नरंदे(ता.हातकणंगले)येथील भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले संदीप बाबासो भोसले(वय ३८)यांना वीरमरण प्राप्त झाले.पुणे येथील सीएएफव्हीडी मध्ये ते सैन्यसेवा बजावत होते.आजारी असल्याने गेली महिनाभर त्यांच्यावर सैन्य हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.आज सकाळी त्यांचे निधन झाले.हजारो ग्रामस्थांच्या उपस्थीतीत दुपारी शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सकाळी त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण गावातील व्यवहार बंद ठेवण्यात आले.पत्नी वसुंधरा,लहान मुलगी वैष्णवी(वय ११) व मुलगा समर्थ (वय ४)यांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
संदीप हे गेली वीस वर्षे सैन्यदलात कार्यरत होते.आज सकाळी त्यांची प्राणज्योत मावळली.दुपारी तीनच्या सुमारास त्यांचे पार्थिव गावात घरी आणण्यात आले. कुटुंबीयांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर ग्रामपंचायत चौकात ग्रामस्थांनी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली.त्यानंतर सजविलेल्या ट्रॅक्टर मधून त्यांची अंत्य यात्रा काढण्यात आली.अमर रहे अमर रहे वीरजवान संदीप भोसले अमर रहे..वीरजवान तुझे सलाम..भारत माता की जय..अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
स्मशानभूमी येथे शोकसभेत मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली.त्यानंतर भारतीय सैन्य दलाकडून हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली.त्यानंतर मुलगा पार्थ व भाऊ अमोल यांच्या हस्ते भडाग्नी देण्यात आला.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगी,लहान मुलगा,आई,भाऊ असा परिवार आहे.आमदार राजू आवळे, माजी खासदार निवेदिता माने,प्रशिक्षणार्थी तहसीलदार सुहास गाडे, सुभेदार कैलास मिलके,डी.के.कदम,जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अशोकराव माने, प्रतापराव देशमुख, माजी उपसभापती राजकुमार भोसले,पी.आर.भोसले,सरपंच पूजा कुरणे,शंकर शिंदे,पोलीस निरीक्षक महादेव तोंदले,यशवंत उपराटे, ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत जाधव,तलाठी डी.के.कदम,प्रकाश गुरव,विजय पाटील,नीतीन पाटील,संजय माने,दिनकर घाडगे,संजय खोत आदींनी श्रद्धांजली वाहिली.