कोल्हापूर : वीर जवान शहीद अभिजीत सूर्यवंशी यांचा २०वा स्मृतिदिन आणि जीवन मुक्ती सेवा संस्था व्हाईट आर्मीच्या २१व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवारी (दि. २५) सायंकाळी साडेसहा वाजता बिंदू चौकात ‘शहीद दिन’ कार्यक्रम होणार आहे. त्यामध्ये डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी आदी कोविड योद्ध्यांचा सत्कार केला जाणार आहे, अशी माहिती ‘व्हाईट आर्मी’चे संस्थापक अध्यक्ष अशोक रोकडे यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. गेल्या वर्षभरामधील शहीद जवान आणि विविध आपत्तीमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तिंना श्रध्दाजंली वाहिली जाणार आहे. श्रध्दादीप प्रज्वलित करून संदेश देण्यात येईल. देशभक्तीपर गीते सादर केली जातील. बिंदू चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावर मशाल रॅली काढली जाणार आहे. महाड दुर्घटनेत मदतकार्य केलेल्या व्हाईट आर्मीच्या जवानांचा सत्कार करण्यात येईल. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून हा कार्यक्रम होणार असल्याचे अशोक रोकडे यांनी सांगितले. यावेळी विनायक भाट, सुमित साबळे, प्रशांत शेंडे उपस्थित होते.
चौकट
कोरोनाकाळात मदतकार्य
व्हाईट आर्मीने कोरोनाकाळात अन्नछत्र आणि कोविड सेंटरच्या माध्यमातून मदत कार्य केले. लॉकडाऊनमध्ये १४० दिवस चालविलेल्या अन्नछत्राचा साडेपाच लाख लोकांनी लाभ घेतला. कोविड सेंटरव्दारे सुमारे ६०० रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरविली. त्यासाठी जिल्हा आणि महापालिका प्रशासनासह विविध संस्था, संघटनांनी सहकार्य केल्याचे अशोक रोकडे यांनी सांगितले.