कोल्हापूर : कर्तव्य बजावत असताना वीरगती प्राप्त झालेल्या पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या स्मृतीस पोलीस प्रशासनाने सोमवारी (दि. २१) स्मृतिस्तंभावर आदरांजली वाहिली. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पुष्पचक्र वाहून आदरांजली वाहिली. पोलीस दलातर्फे बंदुकीच्या तीन फैरी झाडून पोलीस बँडपथकाने बिगुल वाजवून त्यांना मानवंदना दिली. पोलीस कवायत मैदानावर हा कार्यक्रम झाला.
सप्टेंबर २०१८ ते आॅगस्ट २०१९ या कालावधीत देशातील २९२ पोलीस अधिकारी, कर्मचारी कर्तव्य बजावत असताना शहीद झाले. यामध्ये राज्यातील प्रत्येकी एक पोलीस उपनिरीक्षक, सहायक फौजदार, हवालदार, पोलीस नाईक, १६ पोलीस शिपाई अशा २० जणांचा समावेश आहे. गेल्या वर्षी कर्तव्य बजावत असताना वीरगती प्राप्त झालेले अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावे वाचण्यात आली. पोलीस दलातर्फे बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून सलामी देण्यात आली. त्यानंतर स्मृतिस्तंभावर मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. वारके, अधीक्षक डॉ. देशमुख यांनी स्मृतिदिनाचे महत्त्व सांगितले. दरम्यान, यावेळी शहरातील पोलीस ठाण्याचे निरीक्षक, अधिकारी उपस्थित होते.