लोकमत न्यूज नेटवर्क
आमजाई व्हरवडे : कै. मारुती पाटील यांनी राजकारण करत असताना प्रामाणिकपणा जपला. हा प्रामाणिकपणाच गावाच्या विकासासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास आमदार पी. एन. पाटील यांनी व्यक्त केला. राशिवडे खुर्द (ता. राधानगरी) येथील रासलिंग विकास संस्थेचे चेअरमन मारुती पाटील यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात पाटील बोलत होते.
पाटील पुढे म्हणाले, मारुती पाटील यांनी राजकारण करत असताना कोणताही स्वार्थ बघितला नाही. जे केले ते गावासाठीच केले. त्यामुळेच आज सर्व गावाने एकत्र येत त्यांची पुण्यतिथी साजरी केली. ही त्यांनी केलेल्या कामाची पोहोच पावतीच म्हणावी लागेल.
ए. वाय. पाटील म्हणाले, मारुती पाटील यांचे सामाजिक कार्य गावासाठी आदर्श असून, त्यांनी गावात जो एकोपा टिकवला होता, तोच वारसा गावकऱ्यांनी सुरू ठेवावा.
दरम्यान, पुण्यतिथीचे औचित्य साधून सर्व गावाने या निमित्ताने रामलिंग मदिराच्या कळसाच्या कामाचे भूमिपुजन पी. एन. पाटील व ए. वाय. पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ए. वाय. पाटील, ‘भोगावती’चे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील - कौलवकर, ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे, पी. डी. धुंदरे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष कृष्णराव किरुळकर, सरपंच बाळासाहेब कांबळे, जिल्हा बँकेचे उपव्यवस्थापक शिवाजीराव आडनाईक, इंद्रजित पाटील, आदींसह सर्व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ -
कै. मारुती पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करताना आमदार पी. एन. पाटील, ए. वाय. पाटील, उदयसिंह पाटील-कौलवकर, शिवाजीराव आडनाईक, इंद्रजित पाटील, आदी उपस्थित होते.