गारगोटी : हळद, बासमती तांदळाच्या पेटंटसाठी (मानांकन) अमेरिकेशी केलेल्या लढाईत देशातील परंपरागत विज्ञानाला अत्युच्च स्थान मिळवून देणाऱ्या डॉ. माशेलकर यांच्या कार्याची दखल भविष्यातदेखील देश विसरू शकणार नाही. खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्यासारख्या लढवय्या नेत्याच्या नावाने दिल्या जाणाºया या पुरस्काराने त्यांच्या कार्याचा खºया अर्थाने सन्मान झाला आहे, असे गौरवोद्गार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काढले.गारगोटी येथे डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या स्व. खासदार सदाशिवराव मंडलिक स्मृती पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी परिवहनमंत्री दिवाकर रावते होते. यावेळी माजी मुख्यमंत्री चव्हाण पुढे म्हणाले, माहिती तंत्रज्ञानाच्या अतिक्रमणाने येत्या दहा वर्षांत सेवाक्षेत्रातील ६० टक्के रोजगार संपुष्टात येणार आहेत. अर्थव्यवस्था मोडकळीस आली असून, देशापुढे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.समारंभात राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त पद्मविभूषण डॉ. रघुनाथराव माशेलकर, राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त अभिनेते सयाजी शिंदे, शैलजा साळोखे, राजेश्री काळे-नगरकर, गणपतराव आप्पासाहेब पाटील, उज्ज्वला शंकर नागेशकर यांचा सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.मंत्री दिवाकर रावते म्हणाले, सामान्य माणसाच्या उन्नतीसाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालणाºया सदाशिवराव मंडलिक यांनी महाराष्ट्र एकीकरण आणि गोवा मुक्तीच्या लढाईतदेखील सहभाग घेतला होता. अशा लढवय्या नेत्याने आपल्या कार्यकर्तृत्वाने ‘लोकनेते’ हा बहुमान मिळविला आहे.पुरस्काराला उत्तर देताना डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, माझ्या आयुष्यात माझी आई हीच खरी गुरू आहे. स्वत: आशिक्षित असतानादेखील मुलाला उच्चशिक्षित होण्यासाठी ती सतत प्रोत्साहन देत राहिली. यावेळी डॉ. जे. एफ. पाटील, अभिनेते सयाजी शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.स्वागत आमदार प्रकाश आबिटकर यांनी तर प्रास्ताविक प्रा. संजय मंडलिक यांनी केले.यावेळी प्रमुख उपस्थिती श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, शिवसेना संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, माजी आमदार बजरंग देसाई, माजी आमदार दिनकरराव जाधव, कोल्हापूरच्या महापौर शोभाताई बोंद्रे, सभापती स्नेहल परीट, राधानगरीचे सभापती दिलीप कांबळे होते.पुरस्काराच्या रकमेचे दानडॉ. माशेलकर यांनी पुरस्काराची मिळालेली रोख रक्कम अंजली माशेलकर या फौंडेशनला दान केली. तर अभिनेता सयाजी शिंदे यांनी त्यांना मिळालेली रक्कम अमन फौंडेशनला दान केली.
माशेलकरांचे कार्य देश विसरणार नाही : पृथ्वीराज चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 11:51 PM