लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : घरगुती वीजबिलापोटी वीजपुरवठा खंडित केल्यास जनतेच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल, असा इशारा वीजबिल माफी कृती समितीने सोमवारी महावितरणला दिला. यावेळी अधिकारी व आंदोलनकर्त्यांत वादावादी झाल्याने तणाव निर्माण झाला.
लॉकडाऊन काळातील वीजबिले माफ करण्याची घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली होती. मात्र वीजबिल भरावीच लागतील अन्यथा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. त्यानुसार वीजपुरवठा खंडित करण्यास सुरुवात झाल्याने ग्राहक हवालदिल झाले आहेत. ही कारवाई थांबवावी, यासाठी कृती समितीने महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरली. राज्य सरकारच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या.
ग्राहकांवर गुन्हे दाखल करण्यापेक्षा कृती समितीच्या सदस्यांवर गुन्हे दाखल करा, महावितरणची दादागिरी सहन करणार नसल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे यांनी सांगितले.
पोलीस व आंदोलनकर्त्यांत शाब्दिक चकमक
निवेदन देण्यासाठी प्रवेशव्दारातून आत जाताना कृती समितीचे सदस्य व पाेलिसांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. यातून वादाचा प्रसंग उद्भवल्याने तणाव निर्माण झाला.
फोटो ओळी : घरगुती वीजबिले माफ करा या मागणीसाठी सोमवारी कृती समितीने महावितरणच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली. (फोटो-१५०३२०२१-कोल-महावितरण आंदोलन) (छाया- नसीर अत्तार)