कोल्हापूर : लोकशाहीमध्ये शत्रूंना कमी समजायचे नसते, तरीही गेले दहा वर्षांत केलेल्या कामाच्या शिदोरीवर आम्ही सामोरे जात आहोत. आम्ही दलालांच्या माध्यमातून राजकारण करत नसून थेट जनतेत जाऊन करतो, असा निशाणा आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत विरोधकांवर साधला. आमचा सामना काँग्रेसशीच असून पुरोगामी शहरात शिवसेना-भाजप ला जनता स्वीकारणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. सोमवारी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आमदार मुश्रीफ म्हणाले, विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेत्यांनी आश्वासनांची नुसती खैरात केली. एलबीटी माफ करतो म्हटले ती १०० टक्के केली नाही. शंभर दिवसांत टोलमुक्त करण्याची घोषणा केली, त्याचे काय झाले हे जनता बघते आहे. कोल्हापूर खंडपीठाबाबत तर वकिलांच्या चांगुलपणाचा फायदा घेतला. गेले आठ महिन्यांत भाजप नेत्यांचा बुरखा फाटला आहे. जनतेला दिलेले आश्वासन ते पाळू शकले नाही. शाहू महाराजांच्या या शहरात शिवसेना-भाजपचे विचार जनता खपवून घेणार नाही. गतवेळी त्यांनी ताकद बघितली आहे, ५ ते ६ जागा एवढीच त्यांची ताकद. आमची खरी लढाई ही काँग्रेससोबत आहे. आचारसंहितेपूर्वी कोल्हापूरची टोलमाफी करण्याचे पालकमंत्र्यांनी जाहीर केले आहे. त्याचे स्वागत करतो पण महापालिकेने केलेला करार व न्यायालयीन प्रक्रियाही महत्त्वाची आहे. महापालिकेवर कर्जाचा बोजा न पडता टोलमाफी व्हावी, अशी कृती समितीची मागणी आहे, त्याला आमचा पाठिंबा असल्याचेही आमदार मुश्रीफ यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजू लाटकर, सरचिटणीस अनिल साळोखे उपस्थित होते. (प्रतिनिधी)गैरव्यवहारात अडकलेल्यांना उमेदवारी नाहीनिवडून येण्याचे निकष असले तरी चारित्र्यसंपन्न, गोरगरिबांवर प्रेम करणाऱ्या इच्छुकालाच उमेदवारी दिली जाईल. जे गैरव्यवहारात अडकले आहेत, त्यांना कोणत्याही परिस्थितीत स्थान दिले जाणार नसल्याचे आमदार मुश्रीफ यांनी जाहीर केले. आम्ही दलालांच्या माध्यमातून नव्हे, थेट जनतेत जाऊन राजकारण करतो. - हसन मुश्रीफ, आमदारदोन दिवसांत बैठकराष्ट्रवादी-जनसुराज्य आघाडीची जागावाटपाबाबत प्राथमिक बैठक दोन दिवसांत होणार आहे. माजी मंत्री विनय कोरे व आपण याबाबत बसणार असल्याचे आमदार मुश्रीफ यांनी सांगितले.
सामना काँग्रेसशीच
By admin | Published: August 11, 2015 1:34 AM