तानाजी पोवारकोल्हापूर : मटका जुगार प्रकरणात अडकलेल्या पोलीस आधिकाऱ्यांचा पंटरच आता पोलिसांना डोईजड झाल्याची स्थिती आहे. राजारामपूरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस असल्याच्या रुबाबात नेहमी कमरेला महाराष्ट्र पोलीसचे किचन लावून खुले आम वावरणारा प्रीतम पंटरच आता गुन्हा दाखल झाल्यानंतरही पोलिसांच्या हाताला लागेनासा झाला आहे.जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण (डी.बी.) विभागास विशेष महत्व असते. त्या विभागाचे कारनामे सर्वश्रुत असतातच. डी.बी. पथकातील अनेक पोलिसांचे यापूर्वी मटका चालकांशी तसेच अवैद्य व्यावसायिकांशी लागेबांधे असल्याचे उघड झाले. तशा त्यांच्यावर जुजबी कारवाईही झाल्या.
पण झिरो नंबर पोलीस म्हणून वावरणारे, पंटरही या पथकाला सांभाळावे लागतात. पण हेच पंटर आपणच पोलीस असल्याचा दरारा ठेवून वावरतात. बहुतांशी पंटरांचे अवैद्य व्यावसायिकांशी जवळचे संबध हे पथकांच्या नेहमीच सोयीचे व फायद्याचे दिसून आले आहे.राजारामपूरी पोलीस ठाण्यातील डी.बी. पथकाचा खरा चेहरा लाच प्रकरणाने पर्दाफाश झाला. त्यातील डी.बी. अभिजीत गुरवसह एक पोलीस गजाआड असला तरीही त्यांना नेहमीच रसद पुरवण्याचे काम करणारा प्रीतम पंटर हा गायब आहे. प्रतीपोलीस म्हणून वावरणाऱ्या या पंटरचे सोशल मिडीयावरील व्हायरल झालेले फोटो पाहिले तर त्याच्या विरुध्द जाण्याचे कोणाचेही धाडस करणार नाही.राजारामपूरी पोलीस ठाण्यातील प्रत्येक पोलिसांशी अगदी पोलीस अधिकाऱ्यांशी या प्रीतमचे घनिष्ठ संबध फोटो सेशनवरुन दिसते. पोलीस ठाण्यातील समारंभात पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत तर कधी चक्क पोलीस गाडीसोबत त्यांचे फोटो दिसतात.
राजारामपूरी पोलीस ठाण्यातील बहुतांशी पोलिसांच्या वाढदिवसांदिवशी तो हजर राहून शुभेच्छा देतच त्याने बस्तान बसवले. त्यामुळे त्याचे सर्वाशीच फायद्याचे संबध असल्याचे दिसते. अगदी पोलीस ठाण्यातून बदलून गेलेल्या अधिकाऱ्यांसोबतही त्याने आपले जिव्हाळ्याचे संबध दर्शवणारे फोटो व्हायरल केले. अशा पोलिसांच्या आशिर्वादानेच तो मोठा झाल्याची चर्चा आहे. इतके प्रत्येकाशी जिव्हाळ्याचे संबध असतानाही तो कोठे आहे? हे पोलिसांना माहित नाही हेच विशेष.पोलिसांची चक्क वॉकीटॉकी त्याच्या कमरेलासोशल मिडीयावर व्हायरल केलेल्या फोटोमध्ये पोलीस ठाण्यातील वॉकीटॉकी तसेच महाराष्ट्र पोलीसचे बोधचिन्ह असणारे किचनही प्रीतमच्या कमरेला दिसते. विशेष म्हणजे, हा फोटो खुद्द राजारामपूरी पोलीस ठाण्यातच काढला आहे. त्यामुळे त्या पंटरचे वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही कसे संबध होते हे सांगण्याची गरज नाही.पंटरांच्या रुबाबवरही मर्यादा हव्याजिल्ह्यात प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक अधिकाऱ्यांनी पंटर पोसले आहेत. त्यांना जवळ केल्याशिवाय अनेक गुन्ह्यांचा उकलही होत नाही हेही तितकेच सत्य आहे, पण त्यां पंटरच्या रुबाबावर मर्यादा ठेवण्याची आवश्यता निर्माण झाली आहे.