कोल्हापूर: जिल्हा परिषदेत गाजत असलेल्या कुस्ती मॅट घोटाळ्याची फाईल सोमवारी तडजोडीने बंद झाली खरी पण यावरून झालेली विनयभंगाची फाईल खुलीच राहण्याची चिन्हे दिसत आहेत. तक्रारदार असलेल्या अधिकारी महिलेने तक्रार मागे घेत असल्याची चर्चा जिल्हा परिषदेत सुरू होती, पण त्या शाहूपुरी पोलीस ठाण्यास मोबाईल कॉल्सविषयी अधिक माहिती देण्यासाठी गेल्या असल्याचे रात्री स्पष्ट झाल्यानंतर ही चर्चाही थांबली. मंगळवारी तासभर त्यांनी या कॉल्सची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना दिली.
जिल्हा परिषदेत दोन वर्षांपासून क्रीडा प्रशालेतील कुस्तीसाठीच्या मॅटचे प्रकरण गाजत आहे. त्यात घोटाळा झाल्याचे सांगत चौकशी समितीही नियुक्त केली. त्याचा अहवाल बाहेर येण्याआधीच भाजपचे जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते विजय भोजे यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रारच दाखल केली. पंधरा दिवसांपूर्वी या घटनेने जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली. अखेर सोमवारी यावर शिक्षण समितीच्या बैठकीचे निमित्त करून झालेल्या बैठकीत मॅट घोटाळ्यावर पडदा टाकण्याचे ठरले. त्यानुसार ठेकेदाराकडून नवीन मॅट घेण्याचे ठरले.
दरम्यान, हा घोटाळा झाला आहे आणि ठेकेदारासह संबंधित महिला अधिकाऱ्यांवरही चौकशीत ठपका ठेवला आहे, मग केवळ बदनामी नको म्हणून यावर पडदा टाकणे योग्य आहे का, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. केवळ बदनामी होते म्हणून लाखो रुपयांचा घोटाळा दाबून घोटाळा करणाऱ्यांना मोकाट सोडण्यासारखेच आहे, अशीही चर्चा आहे.