कोल्हापूर : महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांतील प्रमुख मटकाकिंग व मुल्ला टोळीतील चाळिसावा ‘मोक्का’तील आरोपी जयेश हिरजी चावला (वय ५०, रा. बोरीबंदर, मुंबई) यास कोल्हापूर पोलिसांनी गुजरातमधील कच्छ भागातून अटक केली. गेले दोन महिने तो पोलिसांना गुंगारा देत होता. आज, सोमवारी त्याला पुण्याच्या मोक्का न्यायालयात हजर केले जाणार आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली.यादवनगर येथील मटका बुकी सलीम मुल्ला याच्यावर कारवाईसाठी गेलेल्या प्रशिक्षणार्थी अप्पर पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्यावर ४० जणांनी हल्ला करून त्यांच्या अंगरक्षकाचे पिस्तूल पळवून नेले. त्यानंतर हे सर्वजण फरार झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी मुल्ला टोळीवर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई केली असून, आजपर्यंत ३९ जणांना ‘मोक्का’ लावण्यात आला आहे.सलीम मुल्ला याचे मुंबईमधील मटक्यातील म्होरक्या जयेश चावला, प्रकाश चावला, वीरेल चावला यांच्याशी लागेबांधे असल्याचे उघड झाले आहे. मुल्ला व त्याच्या टोळीवर कारवाई झाल्यानंतर पोलीस आपल्यापर्यंत येणार, याची खात्री जयेश याला होती. त्यामुळे दोन महिन्यांपासून तो मुंबईतून बेपत्ता झाला होता. तो गायब झाल्याने त्याचा मटक्याचा धंदा बंद झाला होता. शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे व त्यांचे पथक जयेश चावला याच्या मागावर होते. गुजरातमधील कच्छ-भूज भागात तो लपल्याचे समजल्यावर त्याला अटक करण्यात आली. रविवारी पहाटे त्याला कोल्हापुरात आणले गेले. सीपीआर रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. आज, सोमवारी त्याला पुण्याच्या ‘मोक्का’ न्यायालयात हजर केले जाणार आहे.
मटकाकिंग जयेश चावलाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:50 AM