कोल्हापूर : सकल मराठा समाजाने आपल्या न्याय्य हक्कांसाठी शांततेने आणि सनदशीर मार्गाने मूक मोर्चे काढले आहेत. अवघ्या महाराष्ट्रासह देशात व विदेशांतही हे मोर्चे आदर्श ठरले आहेत. मुंबईतील मूक मोर्चा हा बहुधा शेवटचाच असेल. सरकारने तत्काळ याची दखल घ्यावी; अन्यथा सकल मराठा समाजाच्या वतीने या पुढील आंदोलने ही आक्रमकपणे केली जातील, असा निर्धार मुंबईतील ९ आॅगस्ट रोजी मूक मोर्चाच्या नियोजनासाठी शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर येथे रविवारी आयोजित बैठकीत करण्यात आला.बैठकीत कोल्हापूर जिल्ह्यातून एक लाख सकल मराठा समाज मोर्चामध्ये सहभागी होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले. बैठकीस बोलताना खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, मी स्वत: मराठा समाजातील घटक म्हणून या मोर्चात सहभागी होणार आहेत. सोशल मीडियावर काहीजण हा मोर्चा आक्रमकपणे काढण्यात येणार आहे, असा प्रचार करीत आहे. माझी एकच विनंती आहे, ज्याप्रमाणे आतापर्यंत आदर्श असे मोर्चे निघालेत, त्याप्रमाणेच शांततेच्या मार्गाने हा मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. सरकार नक्कीच या मोर्चाची दखल घेईल. कोल्हापूरसह महाराष्ट्रातून मोर्चासाठी रेल्वेचे जादा डबे जोडण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी चर्चा सुरू आहे.आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, शांततेचा शेवट करणारा हा मोर्चा आहे. जर सरकारने सकल मराठा समाजाची दखल घेतली नाही तर यापुढे होणाºया परिणामांना सरकारच जबाबदार असेल. मराठा समाजातील तरुणांना शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण मिळावे यासाठी आपण लढत आहोत. कोल्हापूरमधून जास्तीत जास्त लोक जावेत यासाठी नियोजन समितीने प्रयत्न करावा.आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, विधानसभेत मराठा आरक्षणाची मागणी केली आहे. सरकारही समाजाला आरक्षण देण्यासाठी आपण अनुकूल आहोत, असे सांगत आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने मुंबई मोर्चाच्या नियोजनासाठी जी काही जबाबदारी मला देण्यात येईल, ती माझ्या वतीने पार पाडली जाईल.माजी आमदार सुरेश साळोखे म्हणाले, मोर्चामध्ये ऐन वेळी कोणाला अडचण येऊ यासाठी काही स्वयंसेवक नेमले जावेत. या दहा स्वयंसेवकांचे मोबाईल क्रमांक सर्वांना देण्यात यावेत; त्यामुळे मोर्चातील सर्वांना मदत होईल.प्रा. जयंत पाटील म्हणाले, जे लोक मोर्चात सहभागी होण्यासाठी येणार आहेत, त्यांनी आपली नावे नोंदवावीत; त्यामुळे मोर्चाचे नियोजन करणे सोयीस्कर होणार आहे. माजी नगरसेवक आदिल फरास म्हणाले, मोर्चाची जबाबदारी सर्वांनी उचलली आहे. त्यामुळे तो यशस्वी होणार आहे. संयोजन समिती जी जबाबदारी आमच्याकडे देईल ती आम्ही पार पाडू.नगरसेविका रूपाराणी निकम म्हणाल्या, हा मोर्चा शेवटचा नाही. समाजावरील अन्यायाविरोधात शेवटच्या क्षणापर्यंत लढा सुरूच राहील.शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, नगरसेवक भूपाल शेटे, अॅड. बाबा इंदुलकर, राजू सावंत, सुरेश जरग, हर्षल सुर्वे, सचिन तोडकर, गायत्री राऊत, फत्तेसिंग सावंत, भगवान काटे, सुरेश जरग यांनी मोर्चाबाबत सूचना मांडल्या.यावेळी उपमहापौर अर्जुन माने, नगरसेवक सत्यजित कदम, शारंगधर देशमुख, लाला भोसले, विनायक फाळके, उद्योजक जयेश कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, दुर्गेश लिंग्रस, किशोर घाटगे, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, पै. बाबा महाडिक, अजित खराडे, स्वप्निल पार्टे, राकेश सावंत, संदीप पाटील, उमेश पवार, चारूलता चव्हाण, सुजाता चव्हाण, विजया फुले, वैशाली महाडिक, वंदना आळतेकर, जयश्री जाधव, शारदा पाटील, प्रसन्नता चव्हाण, शारदा पाटील, दीपाताई पाटील, तेजस्विनी पांचाळ, कविता कोंडेकर, सुजया साळोखे, लोकप्रतिनिधींनी पाठविलेले प्रतिनिधी, नगरसेवक, मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते व सकल मराठा समाजातील ज्येष्ठ नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.यांनी जाहीर केल्या गाड्यामुंबई क्रांती मूक मोर्चाला जाण्यासाठी आमदार सतेज पाटील व काँग्रेसच्या नगरसेवकांच्या वतीने सुमारे ४०० गाड्या देण्यात येणार आहेत. याबाबत आमदार सतेज पाटील यांच्या वतीने नगरसेवक प्रवीण केसरकर यांनी बैठकीत जाहीर केले; तर नगरसेवक रविकिरण इंगवले यांनी २५ गाड्या दिल्या जातील, असे सांगितले. यावेळी ज्यांना मोर्चाला जाण्यासाठी गाड्या द्यायच्या आहेत, त्यांनी ५ आॅगस्टपर्यंत शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर येथे समितीकडे नोंदणी करावी, असे आवाहन दिलीप देसाई यांनी केले.अशी होणार नियोजनाची बैठक
मंगळवारी (दि. १) सकल मराठा समाजाच्या वतीने शिवाजी विद्यापीठातील मराठा समाजाच्या नोकरभरती प्रश्नी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना चार वाजता निवेदन.
बुधवारी (दि. २) राजारामपुरीतील सकल मराठा समाजाच्या वतीने मुंबई क्रांती मूक मोर्चाच्या नियोजनासाठी लकी बझारसमोरील घोरपडे सभागृह येथे सायंकाळी सहा वाजता बैठक.
गुरुवारी (दि. ३) मावळा व रणरागिणींच्या नियोजनाबाबत शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर येथे सायंकाळी सहा वाजता बैठक.
रविवारी (दि. ६) शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर येथून सकाळी ११ वा मुंबई मराठा क्रांती मूक मोर्चा जनजागृतीसाठी शहरातून मोटारसायक रॅली.