तांत्रिक गोष्टींचे फारसे अवडंबर न माजविता निवडलेल्या नाटकाशी प्रामाणिक राहिले तर दिग्दर्शकाच्या वाट्याला सहसा निराशा येत नाही. ‘रंगयात्रा’चे तंत्रज्ञ-कलाकार मुळात दिग्दर्शकाशी प्रामाणिक राहिल्याने एक सुविहित प्रयोग पाहिल्याचे समाधान लाभले. तेंडुलकरांचे ‘सरी गं सरी’, वसंत सबनीसांचे ‘विच्छा माझी पुरी करा’ तसेच हे सुनंदा पालवणकरांचे ‘कदचित’ नाटक! वगनाट्याचा फॉर्म वापरून बेतलेलीआणि आपापल्या काळात साहित्य आणि प्रयोगमूल्याच्या दृष्टीने यशस्वी झालेली ही नाटके.‘रंगयात्रा’च्या या नाटकात संगीताची बाजू आणि त्यावर घेतलेली मेहनत प्रयोगातील मेळ राखण्यासाठी वादातीत उपयोगी ठरली; तर उपलब्ध साहित्यात नीटस मांडणी केलेली वेशभूषा व रंगभूषा कलाकारांना छान मोकळीक देत होती. नेपथ्य व प्रकाश योजनेकडे रंगमंचावरील रचनेपुरते केवळ लक्ष दिल्यास ते करून, न करून फारसे काही हाताला लागत नाही. नेपथ्याच्या रचनेपेक्षा त्याची शिस्तबद्घ मांडणी अशा नाटकांना गरजेची असते, याचे भान दिग्दर्शकाला हवे होते. म्हणजे विंगेतील वर्दळ प्रेक्षकांना पाहायला लागून त्यांचा होणारा रसभंग टाळता आला असता. बऱ्याचदा नको इतका आत्मविश्वास दिग्दर्शक नि कलाकाराला नडतो तो असा. डेडो अगर लेव्हल्सना काळी फडकी गुंडाळणे म्हणजे मास्किंग नव्हे. संपूर्ण स्टेजचा गोल्डन पॉइंट लक्षात न घेतल्यामुळे कलाकारांना नको एवढा प्रवास करून वावरावे लागत होते. अशा काही किरकोळ गोष्टी, तंत्र आणि अभिनयातील अतिरेक टाळता येण्यास भरपूर संधी आहे. तुषार कुडाळकर आणि धनश्री गुरव या कलाकारांना असा अतिरेक टाळण्यास भरपूर वाव आहे. अनिरुद्घ दांडेकर, तनुजा मिराशी नाटकाची गती आणि रंगत ठेवण्यास उपयोगी ठरतात; पण तो वेग ज्योतिकिरण माने (यमी), अरुण दळवी (मावशी), अशोक तेलगी (भिकारी) का पकडू शकत नाहीत?सर्वच ग्रुप्सना, बनचुके कलाकारांना गेल्या १५-२० वर्षांत तोंड द्यावे लागत आहे. ऐनवेळी नाटक सोडून जाणे, पाठांतराची ऐशी-तैशी करून सुग्रास अन्नात माती कालविणे हे प्रकार तर भल्याभल्यांनी सोसले आहेतच. या सर्वांवर मात करून ग्रुपचा सूत्रधार म्हणून दिग्दर्शक खटाटोप करीत असतो. ‘रंगयात्रा’चे दिग्दर्शक नक्कीच तावून-सुलाखून आजवर प्रयोग सादर करीत आले आहेत, हे या प्रयोगातूनच दिसते. तथापि, अधिक नीटनेटके आणि वेग सांभाळत हे नाटक सादर केल्यास भविष्यातील यश फार दूर नाही. मिलिंद दांडेकरांचा शाहीर खालच्या पट्टीत असूनही सुरेल होता. त्याला मिळणारी कोरसची साथही नेटकी होती. यमराज, रेडा आणि मृत्यूची सतत भीती बाळगून जिवंत मरण झेलणारा मानव हे खुमासदार पद्घतीने मांडून, प्रयोग रटाळ होऊ न देता त्याची रंगत सतत ठेवून ‘रंगयात्रा’ एक सुविहित प्रयोग देण्यात यशस्वी झाली आहे.प्रसन्न जी. कुलकर्णी
‘कदाचित’... नेटका प्रयोग--राज्य नाट्य स्पर्धा
By admin | Published: December 02, 2015 12:09 AM