लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : शहर व परिसरातील नागरिकांना सणाच्या खरेदीसाठी आवश्यक आस्थापनांना जनता कर्फ्यूतून सूट देण्याचा निर्णय उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी जाहीर केला. मात्र, शहराच्या प्रथम नागरिक व सनियंत्रण समितीच्या अध्यक्ष या नात्याने नगराध्यक्षांनी निर्णय जाहीर करावा, अशा मागणीचे निवेदन नगरसेवक शशांक बावचकर यांनी नगराध्यक्षांना दिले आहे.
या निवेदनात, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सनियंत्रण समितीच्या १० मेला झालेल्या बैठकीत जनता कर्फ्यूचा निर्णय घेण्यात आला. मात्र, शहरातील नागरिकांना सणाच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी आवश्यक आस्थापनांना जनता कर्फ्यूतून सूट देण्यात आली आहे. सनियंत्रण समितीमध्ये १० सदस्य असताना त्यांना न बोलावता तसेच कोणत्याही एका व्यक्तीला निर्णय बदलण्याचे अधिकार नसताना उपनगराध्यक्षांनी परस्पर निर्णय जाहीर केला. हा बदललेला निर्णय सनियंत्रण समितीच्या अध्यक्ष म्हणून नगराध्यक्षांनी जाहीर करणे आवश्यक होते. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या मनामध्ये आपल्या निर्णय क्षमतेबद्दल नाराजी असून, शहराच्या प्रथम नागरिक व सनियंत्रण समितीच्या अध्यक्ष म्हणून नगराध्यक्ष स्वामी यांनी बदललेला निर्णय जाहीर करावा व शहरातील नागरिकांना योग्य ते मार्गदर्शन करावे, असे म्हटले आहे.
चौकट
समिती बरखास्त करावी
नगरपालिका शहर सनियंत्रण समिती बरखास्त करावी, अशा मागणीचे निवेदनही इचलकरंजी नागरिक मंचने प्रांत कार्यालयात दिले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात समिती अपयशी ठरत आहे. दरम्यान, १० मेला पाच दिवसांचा जनता कर्फ्यूचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. परंतु, धार्मिक सण व महापुरूषांच्या जयंतीचे कारण देऊन निर्णयात दोन दिवस किराणा व मसाले दुकानदारांना सवलत दिली. त्यामुळे ही समिती पूर्णपणे अपयशी ठरली आहे, असे म्हटले आहे.