कोल्हापूर : महापालिकेच्या नवनिर्वाचित सभागृहातील पहिल्या महापौर, उपमहापौरांची निवड १६ नोव्हेंबरला होईल. त्याकरिता मंगळवारी(दि.१०) ऐन दिवाळी दिवशीच उमेदवारी अर्ज भरायचे आहेत. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून पदाधिकारी निवडीसाठी सभेची तारीख गुरुवारी निश्चित करण्यात आली. ही निवड जिल्हाधिकारी अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक रविवारी झाली आणि सोमवारी निकाल जाहीर झाला. दुसऱ्याच दिवशी राज्य सरकारच्या राजपत्रात (गॅझेट) नवनिर्वाचित नगरसेवकांची नावे प्रसिद्ध करण्यात आली. मावळत्या सभागृहाची मुदत १४ नोव्हेंबरला संपत असल्याने सोमवारी (दि. १६) महानगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली आहे. सभा बोलविण्यास विभागीय आयुक्त कार्यालयाची गुरुवारी मान्यता मिळाली. त्यानुसार नगरसचिव कार्यालयाने सभेचा अजेंडा प्रसिद्ध करणे आणि हा अजेंडा सर्व नगरसेवकांना घरपोच करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. आज, शुक्रवारी हा अजेंडा सर्वांना पाठविला जाणार आहे. मंगळवारी (दि. १०) ऐन दिवाळी दिवशीच दुपारी ३ ते ५ यावेळेत महापौर व उपमहापौरपदांसाठी उमेदवारी अर्ज भरायचे आहेत. याच दिवशी कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि भाजप-ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांच्या बैठकाही होतील. या बैठकींतून दोन्ही पदांसाठी, दोन्ही आघाड्यांच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात येणार आहे. दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी सर्व नगरसेवक हात वर करून मतदान करतील. सभागृहात पूर्वी गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात येत होते; परंतु पक्षीय व आघाड्यांचे राजकारण सुरू झाल्यापासून उघड पद्धतीने हात वर करून मतदान करण्याची पद्धत अवलंबली गेली आहे. (प्रतिनिधी)मंगळवारी चित्र स्पष्टया पदासाठी काँग्रेसकडून स्वाती यवलुजे यांचे नाव आघाडीवर आहे. सद्य:स्थितीत काँग्रेस व राष्ट्रवादीचे सभागृहात स्पष्ट बहुमत आहे; परंतु भाजपचे नेते व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महापौर भाजपचाच होणार, अशी घोषणा केली आहे. त्यामुळे या निवडीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. लढतीचे चित्र मंगळवारी अर्ज भरल्यावर स्पष्ट होईल.मंगळवारी (दि. १०) : दुपारी ३ ते ५ या वेळेत महापौर व उपमहापौरपदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल. १६ नोव्हेबर : सकाळी ११.०० वाजता प्रथम महापौरपदाची निवड. त्यानंतर त्याच ठिकाणी उपमहापौरपदाची निवडमावळत्या सभागृहाची मुदत १४ नोव्हेंबरपर्यंत पक्षीय बलाबल..काँग्रेस : २७ राष्ट्रवादी : १५ भाजप : १३ ताराराणी : १९ शिवसेना : ०४ ४अपक्ष : ०३ (त्यातील दोघांचा काँग्रेसला पाठिंबा)
महापौर निवड १६ नोव्हेंबरलाच
By admin | Published: November 06, 2015 12:28 AM