आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २0 :दारु व्यवसायातून महसूल मिळावा म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत रस्ते हस्तांतर करण्याचा ठराव केल्यास येत्या आठवड्यातच महापौरांच्या तोंडाला काळे फासणार तसेच या ठरावाला समर्थन देणाऱ्या नगरसेवकांना निषेधार्थ दारुची बाटली भेट देणार असल्याचा इशारा भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका तृप्ती देसाई यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिला.
कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी दुपारी आयोजीत केली होती. शहरातून जाणारे राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग महानगरपालिकेकडे हस्तांतर करण्याचा ठराव हा सभेचा केंद्रबिंदू होता. या ठरावावरुन वाद उफाळल्याने सभागृह अर्धा तासासाठी तहकुब केले होते. त्यादरम्यान, तृप्ती देसाई कोल्हापूर महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर येऊन त्यांनी पत्रकारांशी रस्ते हस्तांतर विषयावर चर्चा केली. त्या म्हणाल्या, अनेक महिलांचे संसार उध्वस्त होत असल्याने तसेच अनेक ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढल्याने उच्च न्यायालयाने हा दारु बंदीचा निर्णय घेतला आहे.
दारुबंदीसाठी भूमाता ब्रिगेडचे संपूर्ण राज्यभर आंदोलन सुरु आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा मान ठेवून कोल्हापूर महानगरपलिकेने दारु व्यवसायातन मिळणाऱ्या महसूलीच्या लोभापोटी पुढे येणारा रस्ते हस्तांतराचा प्रस्ताव हाणून पाडावा. दारुमुळे अनेक महिलांचे संसार उध्वस्त झाले आहेत, तर कोमनपाच्या महापौरपदाच्या खुर्चीवर पण महिला महापौर असल्याने त्यांनी दारुबंदीसाठी रस्ते हस्तांतराचा ठराव मंजूर करु नये. आजच्या सभेत जर हा सदस्यीय ठराव मंजूर केल्यास महापौरांना भूमाता ब्रिगेडच्यावतीने आठवड्यातच कोणत्याही क्षणी काळे फासल्याशिवाय राहणार नाही. तसेच या ठरावाच्या बाजूने समर्थन देणाऱ्या सर्व नगरसेवकांचा निषेध नोंदवत प्रत्येकाला निषेधाचे प्रतिक म्हणून दारुची बाटली भेट देण्यात येणार असल्याचा इशाराही तृप्ती देसाई यांनी यावेळी बोलताना दिला.यावेळी त्यांच्यासोबत भूमाता ब्रिगेडच्या सातारा जिल्हाध्यक्ष सुरेखा तुपे, राजकुमार ठोंबे, माधुरी टोणपे आदी उपस्थित होत्या.
‘आप’च्या कार्यकर्त्यांना मारहाणीचा निषेध
रस्ते हस्तांतराच्या पडद्याआडून दारु व्यवसायिकांना पोषक ठराव करण्याचा प्रयत्न हाणून पाडा म्हणून सांगण्यासाठी गेलेल्या ‘आप’च्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या महापालिकेतील कारभाऱ्यांचा निषेध करत असल्याचे भूमाताच्या तृप्ती देसाई यांनी सांगितले. राज्यात सत्ताधाऱ्यांना दारुबंदी हवी असताना सर्वत्र दारुबंदीसाठी प्रयत्न सुरु आहेत. पण काँग्रेस-राष्ट्रवादी पक्ष कोल्हापूर महापालिकेत दारुबंदीच्याविरोधात भूमीका घेत दारु व्यवसायिकांना पाठींबा का देत आहेत? अशा ठरावाला पाठींबा देणाऱ्या नगरसेवकांचा निषेध नोंदवत त्यांना दारुची बाटली भेट देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.