कोल्हापूर : छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी झालेल्या सामन्यात बालगोपाल तालीम मंडळाने ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळावर ४-० अशा तर शिवाजी तरुण मंडळाने पीटीएम ‘ब’ संघावर ३-० अशा गोलफरकाने मात करत आगेकूच केली.पहिला सामना बालगोपाल तालीम मंडळ विरुद्ध ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ यांच्यामध्ये सामना झाला. सामन्याच्या बाराव्या मिनिटाला बालगोपाल तालीम मंडळाच्या ऋतुराज पाटीलने १२ व्या मिनिटाला गोल करत संघाचे खाते उघडेल. या गोलनंतर ऋणमुक्तेश्वर संघाकडून अनिरुद्ध शिंदे, स्वराज्य पाटील यांनी खोलवर चढाई करत आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना अपयश आले. ४० व्या मिनिटाला बालगोपाल तालीम मंडळाच्या सूरज जाधव गोल करत सामन्यात २-० अशी मध्यंतरापर्यंत आघाडी मिळवून दिली.उत्तरार्धात बालगोपाल तालीम मंडळाने आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला. अभिनव साळोखेने ५६ व्या, पृथ्वीराज पाटीलने ७८ व्या मिनिटाला गोल केला. ऋणमुक्तेश्वर संघाकडून हृषिकेश पडळकर, आकाश मोरे यांनी खाते उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना अपयश आले.दुसऱ्या सामन्यात शिवाजी तरुण मंडळाने पीटीएम ‘ब’ संघावर ३-० अशा गोलफरकाने मात केली. दोन्ही संघांनी प्रारंभी बचावात्मक खेळी करण्यास प्रारंभ केला. त्यानंतर शिवाजी तरुण मंडळाकडून संकेत साळोखे, इथो डेव्हिड यांनी पीटीएम संघाची बचावफळी भेदत खोलवर चढाया करत सामन्यावर पकड निर्माण करण्यास प्रारंभ केला. ही रणनीती यशस्वी झाली. ३३ व्या मिनिटाला संकेत साळोखेने गोल करत सामन्यात १-० अशी आघाडी घेतली. पाठोपाठ इथो डेव्हिडने गोल करत मध्यंतरार्यंत शिवाजी तरुण मंडळाला २-० अशा गोलफरकाने आघाडी मिळवून दिली.उत्तरार्धात पीटीएम ‘ब’संघाकडून प्रथमेश पाटील, रोहित पोवार, यश देवणे, सूरज हकीम यांनी गोल करण्याचे प्रयत्न केले. मात्र, शिवाजी तरुण मंडळाचा गोलकिपर निखिल खन्नाने त्यांचे प्रयत्न हाणून पाडले. ७८ व्या मिनिटाला शिवाजी तरुण मंडळाच्या संकेत साळोखेने वैयक्तिक दुसरा व संघाचा तिसरा गोल करत सामन्यात ३-०अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. ही आघाडी सामन्याच्या शेवटच्या मिनिटापर्यंत कायम राहिली.