कोल्हापूर : वाढत्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांच्या निर्देशानूसार १९ ते २२ मार्च दरम्यान राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानात होणाऱ्या महापौर चषक कुस्ती स्पर्धा स्थगित करण्यात आल्याची माहीती महापौर निलोफर आजरेकर व राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष व्ही.बी. पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.राज्याचे मुख्य सचिवांनी गुरूवारी (दि. ५) कोरोना व्हायरस प्रतिबंधात्मक उपाययोजनासंबधी व्हीडीओ कॉन्फरन्स घेवून राज्यातील यात्रा, समारंभ, उत्सव आदी मोठे जनसमुदाय एकत्रित आणणाऱ्या कार्यक्रमांना प्रतिबंध अथवा नियंत्रण करावे. याकरिता सर्व महापालिका व नगरपालिकांनी परावृत्त करावे. जनजागृती करण्यासाठी होर्डिंग्ज, फलक, सार्वजनिक रुग्णालये सज्ज ठेवावीत. अशा सुचना दिल्या आहेत.
कोल्हापूर महानगर पालिकेतर्फे १९ ते २२ मार्च दरम्यान होणारी महापौर कुस्ती स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. अशी माहिती महापौर आजरेकर यांनी दिली. स्पर्धेची पुढील तारीख शासनाच्या परवानगीनूसार एप्रिल २०२० मध्ये घ्यावी, अशी सुचना तालीम संघाचे उपाध्यक्ष अॅड. महादेवराव आडगुळे यांनी केली.
यावेळी हिंदकेसरी दिनानाथसिंह, महाराष्ट्र केसरी नामदेव मोळे, विष्णू जोशीलकर, ज्येष्ठ मल्ल संभाजी पाटील, गटनेते शारंगधर जाधव, नगरसेवक अशोक जाधव, माजी महापौर आर.के. पोवार, मारूतराव कातवरे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
फुटबॉल स्पर्धा नियमित वेळेनूसारचछत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या महापौर चषक फुटबॉल स्पर्धा नियमित वेळेनूसारच होणार आहेत. यात कोरोना व्हायरसचा कोणताही अडसर येणार नाही. यासाठी महापालिका प्रशासन योग्य ती खबरदारी व जनजागृती करीत आहे. असेही महापौर आजरेकर यांनी स्पष्ट केले.