कोल्हापूर : खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण, दहशत माजवणे, लुटमारी, खंडणी अशा प्रकारचे पंधरा पेक्षा अधिक गुन्हे दाखल असणाऱ्या सागऱ्या पवार गॅँगच्या मोक्का कारवाईला विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सोमवारी मंजुरी दिली. जिल्हा पोलिस अधीक्षक महिंद्र पंडित यांनी या टोळीवरील संघटित गुन्हेगारीचा प्रस्ताव पाठवला होता.कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात या टोळीने दहशत माजवली होती. कुरुंदवाड येथे या टोळीने सुनील चव्हाण यांचा खून केला होता. याप्रकरणी जालिंदर सांडगे यांनी कुरुंदवाड पोलिसांत फिर्याद दिली होती. कोल्हापूर पोलिसांनी या टोळीवरील गुन्ह्यांची माहिती काढली असता त्यांच्यावर आजपर्यंत १५ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात पुढे आले. त्यानुसार त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी अंतर्गत मोक्का कारवाईचा प्रस्ताव तयार केले.पोलिस अधीक्षक पंडित यांनी हा प्रस्ताव तयार करून घेऊन त्यातील त्रूटी दूर केल्या. त्यानंतर प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे पाठवला. सोमवारी त्याला मंजुरी मिळाली आहे. मोक्काअंतर्गत कारवाईला मंजुरी मिळाल्यांमध्ये सागऱ्या पवार टोळीतील टोळीप्रमुख सागर अरविंद पवार (रा.विटा, खानापूर, जि. सांगली), राहुल किरण भंबीरे (रा. कुरुंदवाड, ता. शिरोळ, कोल्हापूर), पवन नागेश कित्तुरे (रा. कुरुंदवाड), शहाजान अल्लाबक्ष पठाण (रा. इचलकरंजी), अनिकेत दत्तात्रय ढवणे (रा. कराड रोड, विटा), तुषार तुकाराम भारंबल (रा. शाहूनगर विटा), रोहन किरण जावीर (विटा, खानापूर), रितेश विकास खरात (विटा), सोहन माणिक ठोकळे (रा. विटा, आदर्शनगर) अशी संशयितांची नावे आहेत.कुरुंदवाड पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी रविराज फडणवीस, उपअधीक्षक समरसिंह साळवे, गडहिंग्लज विभागाचे अपर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी हा प्रस्ताव तयार करून तो पोलिस अधीक्षकांकडे पाठविला होता.
सागऱ्या पवार टोळीला मोक्का; कोल्हापूर, सांगलीत होती दहशत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 1:06 PM