प्रदीप शिंदे--कोल्हापूर --ग्रामीण भागातून रोज मोठ्या प्रमाणात कामगार एमआयडीसीला ये-जा करतात. सर्वांकडे दुचाकी नसल्यामुळे आणि वाहतुकीची पूरक व्यवस्था नसल्याने त्यांना अवैध वडापचा आधार घ्यावा लागतो. मात्र, या धोकादायक प्रवासात अपघात होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशा घटना घडू नयेत म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने कामगारांच्या मागणीनुसार त्यांच्या गावांतून एम.आय.डी.सी.पर्यंत एस.टी.ची विशेष सोय केली आहे. जिल्ह्यामध्ये गोकुळ शिरगाव व कागल पंचतारांकित या औद्योगिक वसाहतींमध्ये ग्रामीण भागातील कामगार रोजगारासाठी येतात. त्यांपैकी काहीजण दुचाकीवरून प्रवास करतात. रात्री-अपरात्री दुचाकीवरून प्रवास करताना कामगारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, तर ज्यांच्याकडे दुचाकी नाही, त्या कामगारांना व्हॅन, अॅपेरिक्षा, रिक्षा, जीप यांतून प्रवास करावा लागतो आहे. हे वाहनधारक जास्त पैसे मिळविण्याच्या उद्देशाने प्रवासी वाहतूक क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून जादा फेऱ्या करण्यासाठी वेगाने वाहने पळवितात. त्यामुळे या मार्गावर अपघातांमध्ये वाढ होत आहे. निपाणी-मुरगूड राज्यमार्गावर गेल्याच महिन्यात बस्तवडे (ता. कागल) येथे व्हॅन खणीत कोसळून सात कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. अशा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी व प्रवाशांच्या मागणीनुसार राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाने कामगारांच्या सोयीसाठी गावातून एस. टी. उपलब्ध करून देण्यात येत आहेत. गोकुळ शिरगाव व कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये तीन शिफ्टमध्ये काम चालते. त्यानुसार आता एस. टी. गाड्या सोडण्याचे व कामगारांना ने-आण करण्याचे नियोजन केले आहे. यामुळे कामगारांचा प्रवास सुखकारक आणि सुरक्षित होणार आहे.४२ फेऱ्या प्रस्तावित...गोकुळ शिरगाव व पंचतारांकित कागल एमआयडीसीमध्ये काम करणाऱ्या व आजूबाजूच्या परिसरांमध्ये राहणाऱ्या कामगारांच्या सोईसाठी ९१ फेऱ्या तिन्ही शिफ्टसाठी कोल्हापूर विभागातर्फे सुरू आहेत. मागणीनुसार या फेऱ्यांमध्ये वाढ करून ३० फेऱ्या नव्याने सुरू केल्या आहेत; ४२ फेऱ्या प्रस्तावित आहेत. नव्याने सुरू झालेल्या एस.टी. कागल पंचतारांकित एम.आय.डी.सी.: नंदगाव, कळे, कागल, गिरगाव, माद्याळ, मुरगूड, म्हाकवे, शेंडूर, गोरंबे, राधानगरी, गारगोटी ते एमआयडीसी.गोकुळ शिरगाव एम.आय.डी.सी : कागल, माद्याळ, करंजीवणे, सावर्डे, हदनाळ, रंकाळा, कागल, नेर्ली, गडहिंग्लज ते एमआयडीसीकामगारांना सवलत : एस. टी. महामंडळाकडून कामगारांना प्रवासी पास दिला जातो. यामध्ये २० दिवसांच्या पैशात ३० दिवसांचा प्रवास करायचा, तर तीन महिन्यांसाठी ५० दिवसांचे पैसे भरायचे आणि ९० दिवस प्रवास करायचा, अशा दोन पासची सोय आहे. अवैध प्रवासातील धोके समोर आल्याने कामगार आता एस.टी.ला पहिली पसंती देत आहेत. त्यामुळे अनेक गावांतून एमआयडीसीपर्यंत गाडी सुरू करावी, अशी मागणी होत आहे. आता गावातील मागणीनुसार गाड्यांची संख्या वाढविली जात आहे.- नवनीत भानप, विभाग नियंत्रक, कोल्हापूर विभाग
एमआयडीसी कामगारांचा प्रवास होणार सुखाचा
By admin | Published: January 05, 2017 1:02 AM