शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचा एकनाथ शिंदेंविरोधात डाव; ठाकरे गटाच्या उमेदवाराला मदत करण्याची भूमिका
2
अवघ्या ५ दिवसात काँग्रेस नेता स्वगृही परतणार; वंचितचा AB फॉर्म घेऊन अर्ज भरला नाही
3
"मनात पक्कं केलंय, अशा लोकांविरोधात..."; शायना एनसी यांची अरविंद सावंतांवर खरमरीत टीका
4
स्पेनमध्ये  'महापूर', 205 जणांचा मृत्यू, 1900 बेपत्ता, 130000 हून अधिक घरांची वीज गुल; पंतप्रधानांनी पाठवले 2000 सैनिक
5
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची मोठी कारवाई; अनंतनागमध्ये ३ ठिकाणी चकमक, दोन दहशतवादी ठार
6
IND vs NZ: पहिल्या २ कसोटीतील बिघाडीनंतर अखेर टीम इंडियानं घेतली अल्प धावांची आघाडी
7
काकांसोबत पुतण्याही रिंगणात, मतदारसंघ अन् पक्षही वेगळे; कोण कुठून लढणार?
8
एकनाथ शिंदेंच्या विधानानंतर मनसेचा हल्लाबोल; कल्याणची आठवण करून देत म्हणाले...
9
Prashant Kishor : "पैसे घ्या पण बदल्यात 'हे' काम करा"; प्रशांत किशोर यांनी जनतेला केलं अनोखं आवाहन
10
प्रसिद्धीची हवा डोक्यात जाऊन गर्लफ्रेंडपासून गेला दूर, पुढे तिच्याशीच बांधली रेशीमगाठ! आज लग्नाला १६ वर्ष
11
iPhone 16 नंतर 'या' देशानं Google च्या फोनवरही घातली बंदी; कारण काय?
12
'लाडकी बहीण' योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे केव्हा मिळणार? मुख्यमंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी!
13
"काठीने मारहाण, ३ दिवस टॉयलेटमध्ये बंद"; सावत्र बाप झाला हैवान, चिमुकल्यांनी मांडली व्यथा
14
अमित ठाकरे-सदा सरवणकर वाद: CM एकनाथ शिंदे म्हणतात, "मी राज ठाकरेंना तेव्हाच विचारलं होतं..."
15
प्रशांत किशोर एका निवडणुकीत सल्ला देण्यासाठी किती कोटी रुपये घेतात? स्वतःच केला खुलासा; रक्कम जाणून थक्क व्हाल!
16
Bhai Dooj 2024: बहिणीला ओवाळणीत काय भेटवस्तू द्यावी याचा विचार करताय? हे वाचाच!
17
'पाडव्याला नवऱ्याने स्तुती केल्यावर...'; अविनाश-ऐश्वर्या नारकर यांचा नवीन रील व्हिडीओ चर्चेत
18
Apple ची भारतात विक्रमी कमाई; iPhone ची बंपर विक्री, टिम कुक यांची ४ नवी स्टोअर्स उघडण्याची घोषणा
19
IND vs NZ: सोधीचा चेंडू हातभर वळला अन् 'शतकी' उंबरठ्यावर फुटली शुबमन-पंत सेट झालेली जोडी
20
पेंट तयार करणाऱ्या 'या' दिग्गज कंपनीची होणार विक्री; अदानी, JSW सह दिग्गजांची नजर; शेअरमध्ये तेजी

जीवनाचे सार्थक- लाल माती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 12:09 AM

मी सहा वर्षांचा असताना वडील वारले. मी पैलवान व्हावे, अशी त्यांची खूप इच्छा होती; त्यामुळे चुलत्यांनी मला प्रथम १९५२ ला मुंबईला व त्यानंतर कोल्हापूरला पाठविले. त्यावेळी आई असे म्हणाली होती, ‘पैलवान बनके ही आना... नहीं तो वही खप जाना..! आज मागे वळून पाहताना वाटते की, माझ्या जीवनाचे सार्थक झाले.

मी सहा वर्षांचा असताना वडील वारले. मी पैलवान व्हावे, अशी त्यांची खूप इच्छा होती; त्यामुळे चुलत्यांनी मला प्रथम १९५२ ला मुंबईला व त्यानंतर कोल्हापूरला पाठविले. त्यावेळी आई असे म्हणाली होती, ‘पैलवान बनके ही आना... नहीं तो वही खप जाना..! आज मागे वळून पाहताना वाटते की, माझ्या जीवनाचे सार्थक झाले. गेल्याच आठवड्यात सातारा जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष साहेबराव पवार (वय ९०) यांचा फोन आला. माझ्या बोलण्यात एकेठिकाणी परकेपणाची भावना व्यक्त झाली होती. त्यावर ते म्हणाले, ‘तुमचा जन्म कुठलाही असला, तरी कोल्हापूर आणि महाराष्ट्राने तुमच्या कर्तृत्वावर प्रेम केले आहे. तुम्ही आला कुठून हे महत्त्वाचे नाही, तुम्ही इतिहास निर्माण केला. तुम्ही सज्जन माणूस आहात. फार कमी पैलवानांमध्ये हा गुण असतो, तो तुमच्याकडे आहे. आमचे लाडके मल्ल गणपतराव आंदळकर, श्रीपती खंचनाळे, मारुती माने ऊर्फ भाऊ यांनीही कुस्तीत इतिहास निर्माण केला; परंतु महाराष्ट्राच्या दुर्दैवाने त्यांच्या कर्तृत्वाची म्हणावी तेवढी नोंद झाली नाही. जी ‘लोकमत’मुळे तुमची झाली. त्या अर्थाने तुम्ही भाग्यवान ठरला.’

‘लोकमत’मधून गेले वर्षभर दर रविवारी ‘लाल माती’ या सदरात माझे आत्मवृत्त प्रसिद्ध झाले. प्रत्येक रविवारची सकाळ माझी फोन घेण्यात जाई. खूप वेगवेगळ्या गावांतून लोक नंबर शोधून फोन करत व प्रतिक्रिया नोंदवत. कºहाडच्या सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक संजय जगदाळे हे आवडीने कायम फोन करत. पैलवान एवढे शहाणे नसतात; परंतु तुमच्याकडे सरस्वतीचीही देणं आहे, असे ते म्हणायचे. मी त्यांना सांगत असे, मी माझे अनुभव तोडक्यामोडक्या भाषेत सांगतो आहे, त्याला शब्दांचा साज चढविण्याचे काम हे लेखक विश्वास पाटील यांचे आहे. माजी महापौर महादेवराव आडगुळे यांना मी सगळ्या घटनांच्या तारीखवार नोंदी कशा देतो, याचे अप्रूप वाटे. पूर्वीची कुस्ती म्हणजे आडदांड ढाच्यातील.

पैलवानांच्या मानेवर गुडघा टेकून जोरात हाण, असे सांगितले जाई. आता कुस्ती नियमांमध्ये बांधली गेली आहे; परंतु आमच्यावेळी तसे नव्हते; त्यामुळे पैलवानांची स्मरणशक्ती कमी होणे, दृष्टी अधू होणे, शारीरिक विकलांगता असे वाट्याला येई. मी गंगावेश तालमीचा मल्ल. आमचे वस्ताद बाबूराव गवळी, आण्णाप्पा पाडळकर यांना दूरदृष्टी होती. ते आम्हाला सारखे असे सांगायचे की, ‘भडविच्यांनो, आमच्या काही लक्षात राहिले नाही; त्यामुळे आम्ही काहीच लिहून ठेवू शकलो नाही, किमान तुम्ही तरी एक वही घालून त्यामध्ये कुस्तीबद्दल नोंदी करून ठेवा’. आमच्या तालमीतील सगळ्याच मल्लांना ते हे वारंवार सांगत असत. त्यानुसारच मी छोटी डायरी घातली व कुस्ती झाल्यावर तीन-चार दिवसांनी तारीखवार नोंदी करत गेलो.

प्रत्येक कुस्तीतून मला किती बक्षीस व वेगळे इनाम किती मिळाले याचीही नोंद केली. आयुष्यातील चढउतारही त्यामध्ये नोंदवले आहेत; त्यामुळे ती तारीख वाचली की, माझ्यासमोर त्या कुस्तीचा सारा फडच उभा राही. तसा परमेश्वराचा मी ऋणी आहे; कारण आजही माझी स्मरणशक्ती, दृष्टी अत्यंत चांगली आहे; त्यामुळे जे घडले, ते जसेच्या तसे मला आठवत गेले. कोरेगावचे नंदकुमार विभूते हे आत्मवृत्त वाचून भाषा हृदयाला हात घालते, असे म्हणायचे. रयत शिक्षण संस्थेतील प्रा. दिलीप पवार यांनी तर ‘यह तो गंगामैया का वरदान है...’ इतिहासाबद्दल अभिमान आहे, अशी भावना व्यक्त केली. शिंगणापूर (ता. करवीर)च्या भिकाजी कुलकर्णी यांची आठवण वाचून त्यांच्या पत्नीला रडू कोसळले. आपले वडील इतके चांगले पैलवान होते, हे समजल्यावर साऱ्या कुटुंबालाच कमालीचा आनंद वाटला. ते सारेजण येऊन घरी भेटून गेले. डोणोलीचे सीताराम काशीद यांच्याबद्दलची आठवण झाल्यावर त्या गावाने फटाके वाजवून आनंद व्यक्त केला. ते स्वत: पती-पत्नी येऊन भेटून गेले. कुस्ती जिंकल्यावर लोकांनी त्यांना चादर भरून पैसे दिल्याचा उल्लेख आला होता; त्यामुळे सीताराम यांच्या नातीने आजोबा, ते चादर भरून मिळालेले पैसे कुठे ठेवलेत, ते मला द्या, अशी मागणी केली. अशा जुन्या स्मृतींना उजाळा मिळाल्यावर अनेकांना आनंद मिळाला.

महाराष्ट्राला माझी ‘हिंदकेसरी’ अशी ओळख असली तरी आणखी एक-दोन गोष्टी अशा आहेत की, त्याबद्दल लोकांना फारसे माहीत नाही. मला हस्तरेषा व कुंडलीही चांगली समजते. बनारसला देवकीनंदन शास्त्री म्हणून हस्तरेषा व कुंडलीतज्ज्ञ होते. त्यांच्याकडे त्यावेळी इंदिरा गांधीही मुहूर्त पाहायला माणसे पाठवून देत. त्यांनी मला काही पुस्तके दिली; त्यामुळे मलाही त्याचा शौक लागला. तो आजही कायम आहे. आता माझ्याकडे पुण्यासह अनेक भागांतून कुंडली व हस्तरेषा पाहण्यासाठी लोक येतात. कुस्तीइतकीच माझी या क्षेत्रातही ओळख निर्माण झाली आहे. माझे शालेय शिक्षण फारसे झालेले नाही; परंतु आमच्या गावात उर्दू भाषा शिकवली जात होती. बोलण्यातही उर्दूमिश्रित हिंदीचा वापर; त्यामुळे मला उर्दू शिकण्याची इच्छा झाली. त्यावेळी डॉ. मोहम्मद इकबाल, जिगर मुरादाबादी, दागसाहेब देहलवी हे उर्दू शायर खूप प्रसिद्ध होते. त्यांचे साहित्य वाचून माझा शेरोशायरीचा अभ्यास झाला; त्यामुळे भाषणामध्ये त्याचा उपयोग करत गेलो. त्यातून भाषेतील गोडवा लोकांनाही आवडू लागला. एकदा खासदार उदयसिंहराव गायकवाड यांच्या शाहू स्मारक भवनातील प्रचार सभेवेळी जोरदार पाऊस आला; त्यामुळे लोक निम्मे सभागृहाबाहेर व निम्मे आत असे चित्र होते. मी बोलायला उभे राहिलो. एक शेर सांगितला. एक प्रेमिका आपल्या प्रियकराची वाट पाहत असते आणि पाऊस सुरू होतो. ती म्हणते, ए अब्रे करम..जरा थम थम के बरस..एैसा न बरस की वो आ ना सके..वो आ जाएँ तो जमके बरस..एैसा बरस की वो जा ना सके..! लोकांचा टाळ्यांचा पाऊस पडला.

माझी लाल मातीतील शेवटची लढत १९७८ला संपली, तरी मी गंगावेश तालमीत जाऊन लंगोटवर १९९५ पर्यंत आखाड्यातील कुस्ती करत होतो. कोगे (ता. करवीर) येथील विश्वास हारूगले हा चांगला वस्ताद तालमीला मिळाल्यावर मी आखाड्यात उतरायचे कमी झालो; परंतु तालीम बंद केलेली नाही. आजही तीन-चार दिवसांनी पहाटे ५.३० वाजता तालमीत जातो व मेहनत करतो; त्यामुळेच शरीर चांगले राखू शकलो. मला कुठलेच व्यसन नाही. आईमुळे रामायण-महाभारत वाचण्याची सवय लागली; त्यामुळे ते किमान १00 वेळा वाचून काढले आहे. मुन्शी प्रेमचंद, अण्णाभाऊ साठे यांचे समग्र वाङ्मय वाचून काढले. आज तुम्हा सर्वांचा निरोप घेताना ‘लोकमत’ वृत्तपत्र व त्याचे संपादक वसंत भोसले यांच्याबद्दल माझ्या मनांत कृतज्ञतेची भावना आहे. त्यांच्यामुळेच माझ्यासारख्या मल्लाची जीवनगाथा लोकांसमोर येऊ शकली. ‘लाल माती’मुळे माझे जीवन घडले. ते जीवन ‘लोकमत’ने मांडले व आता ते लवकरच पुस्तकरूपानेही प्रसिद्ध होत आहे. (समाप्त)शब्दांकन : विश्वास पाटील