कोल्हापूर : ‘अच्छे दिन’ येण्याची स्वप्ने दाखवीत सर्वसामान्यांची मते मिळवून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सत्ताधारी झाल्यावर मात्र आपले खरे रूप दाखविले आहे. आधीच्या सरकारने केलेल्या कायद्यातील शेतकरी हिताच्या तरतुदी बदलून नव्या कायद्यात उद्योगांना झुकते माप देण्यात आल्याचे दिसते. मोदी सरकारचे इमान सर्वसामान्य नागरिक, शेतकऱ्यांशी नव्हे, तर उद्योगपतींशी असल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी व्यक्त केले. शाहू स्मारक भवन येथे गुरुवारी ‘आम्ही भारतीय लोकआंदोलन’तर्फे कै. के. ब. जगदाळे जन्मशताब्दीनिमित्त आयोजित व्याख्यानात ‘केंद्र सरकारची विकासनीती आणि आपण’ या विषयावर त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी आमदार संपतराव पोवार-पाटील होते. महाजन यांनी आपल्या भाषणाची सुरुवात डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि डॉ. एम. एम. कलबुर्गी यांना श्रद्धांजली वाहून केली. यावेळी त्या म्हणाल्या, निवडणुकीपूर्वी मोदींची प्रतिमा ‘विकासपुरुष’ अशी करण्यात आली होती. मात्र, निवडणुकीनंतर त्यांची प्रतिमा पूर्णपणे उलटी दिसत आहे. मोदी ज्या योजनांचा जयघोष करीत आहेत, त्या स्मार्ट सिटी, औद्योगिक कॉरिडॉर, नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग झोन यासारख्या प्रकल्पांना प्रचंड जमीन लागणार आहे. दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरसाठी भूसंपादन चालू आहे. या प्रकल्पाचे प्रभावित क्षेत्र आहे ४ लाख ३६ हजार ४८६ चौरस किलोमीटर. हे संपूर्ण संपादित होणार नसले, तरी यामध्ये किमान ३ लाख ९० हजार हेक्टर जमिनीचे संपादन होणार आहे. असे आणखी तीन कॉरिडॉर होऊ घातले आहेत, ज्यांत अमृतसर-कोलकाता, मुंबई-बंगलोर, चेन्नई-बंगलोर यांचा समावेश आहे. मोदींना आणखी १९ कॉरिडॉर करायचे आहेत. यामध्ये ४० टक्क्यांपेक्षा जास्त जमीन जाणार आहे. त्यांना लागणारे पाणी, वीज, रेती, माती, दगड यासाठी तसेच सहापदरी, आठपदरी रस्ते यामध्ये जमिनी जाणार आहेत. या नव्या व्यवस्थेत ग्रामीण कारागीर, शेतमजूर त्यांच्या घरातील पुढील पिढी यांना काय स्थान असेल, सामान्य जनतेच्या अन्नसुरक्षेचे भवितव्य काय, या प्रश्नांची उत्तरे देण्यास मात्र सरकार अनुत्तरित असल्याचे महाजन यांनी सांगितले.महाजन म्हणाल्या, एकीकडे कामगारांची पिळवणूक करण्यासाठी भांडवलदारांना पोषक वातावरण निर्माण केले जात आहे. असंघटित लोकांनाच कायद्याचा धाक दाखवून लुबाडण्याचा उद्योग सध्या सुरू आहे. हे समाजवादाला मारक असून याविरुद्ध जनमत तयार करण्याची गरज आहे. याप्रसंगी अॅड. अशोकराव साळोखे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सहनिमंत्रक चंद्रकांत यादव यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. अनिल घाडगे यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी व्यासपीठावर ‘आम्ही भारतीय’चे मुख्य प्रवर्तक बाळ पोतदार, सहनिमंत्रक संभाजीराव जगदाळे, माजी महापौर शिवाजीराव कदम, उषा शिंदे होते. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मोदी सरकारचे उद्योगांना झुकते माप
By admin | Published: October 02, 2015 1:21 AM