कोल्हापूर : शहरातील वाहतूक कोंडीवर आठ दिवसांत उपाययोजना करा, असे आदेश महापौर निलोफर आजरेकर यांनी दिले. मंगळवारी शहरातील १७ ब्लॅक स्पॉटची त्यांनी पाहणी केली. वाहतूक संदर्भातील करण्यात येत असलेल्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. सीपीआर चौक, व्हीनस कॉर्नर, कावळा नाका, लिशा हॉटेल चौक याठिकाणी पाहणी करण्यात आली.शहरातील १७ ब्लॅक स्पॉट ठिकाणे निश्चित केली आहेत. येथे तात्पुरत्या व काही कायमस्वरूपी उपाययोजना सुचविलेल्या आहेत. तात्पुरत्या उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवून कामे सुरू केली आहेत. संबंधित ठेकेदाराने सात महिने झाले तरी काम अपूर्ण ठेवल्यावरून महापौर आजरेकर यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले.शहरामध्ये ट्रॅफिकची समस्या वाढत चाललेली आहे. त्यामुळे आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करून घेण्याच्या सूचना दिल्या. चौकामध्ये हजार्ड मार्करची संख्या कमी असून ती वाढवण्यात यावी, व्हीनस कॉर्नर येथील राजाराम महाराज यांच्या पुतळ्याजवळील चौकातील पोल लहान टाकून बाजूला स्थलांतर करा. तसेच शहरातील सिग्नल व्यवस्था सुरळीत व सुस्थितीत ठेवा, असे आदेशही महापौर आजरेकर यांनी दिले. रिफ्लेक्टर कधी बसविणार असा जाब त्यांनी विचारला.शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सद्य:स्थितीत ३६ ट्रॅफिक साईन बोर्ड विविध ठिकाणी बसविले आहेत. तोरस्कर चौक, शिरोली प्रवेश कमानीच्या अलीकडे पुलावर रस्त्याच्या कडेला सुरक्षा गार्ड रेलिंग (लोखंडी) बसवले आहेत. तसेच ब्लॅक स्पॉट मधील चौकाचे ठिकाणी व अन्य चौकामध्ये एकूण १० हजार्ड मार्कर बसवल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे व्हीनस चौक व लिशा हॉटेल चौक येथील झेब्रा क्रॉसिंग पट्टे व स्टॉप लाईन पट्टे मारण्याचे काम पूर्ण केले.
उर्वरीत चौकांचे ठिकाणी थर्मोप्लास्टिक पट्टे मारण्याचे काम व त्यावर कॅट आईज बसविणेचे काम येत्या ८ दिवसांत पूर्ण केले जाणार असल्याचे सांगितले. यावेळी उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती संदीप कवाळे, नगरसेवक राहुल चव्हाण, रियाज सुभेदार, अश्पाक आजरेकर उपस्थित होते.