कोल्हापूर : आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी जीवनमुक्ती सेवा संस्थेच्यावतीने सुसज्ज यांत्रिक दोन बोट, वॉटर रेस्क्यु टीम तैनात ठेवण्यात आली आहे. तसेच वैद्यकीय सोयीसुविधा देण्यात येत आहेत. अशी माहिती प्रमुख अशोक रोकडे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले, विसर्जन मिरवणुकीत मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, अंबाबाई मंदिर, पापाची तिकटी या ठिकाणी वैद्यकिय पथकासह रेस्क्यु टीम तयार आहेत. यात एका टीमकडे अॅम्ब्युलन्ससह दोरखंड, फायर इक्स्टींग्युशर, स्ट्रेचर व्हाईट आर्मी जवान पॉकेट लाईनच्या आधारे गर्दीवर नियंत्रण करणे व जाणे-येणे, मार्गामध्ये व्यवस्था लावणे अशी कामे देण्यात आली आहेत.
ही टीम आपत्तीवेळी नियोजनबद्ध आणि प्रथमोपचार करून डॉक्टरांच्या सल्ल्याने सीपीआरमध्ये पुढील उपचारासाठी हलवण्याची जबाबदारी घेईल. या ठिकाणी व्हाईट आर्मीच्या वैद्यकिय पथकात जनरल प्रॅक्टीसनर्स असो, डॉक्टरांची निहा, निमा संघटना, जिल्हा मुस्लिम मेडिको व पॅरामेडिको असोसिएशन, कोल्हापूर जिल्हा जनरल प्रॅक्टीसनर्स असोसिएशन या संघटनाचे डॉक्टर्स मदत कार्यात सामील होत आहेत.आपत्कालीन वैद्यकिय पथकाजवळ सावली केअर सेंटर, अॅस्टर आधार हॉस्पीटल, श्री करवीर निवासीनी अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळ व व्हाईट आर्मी यांची मदत घेवून अॅम्ब्युलन्स सुविधा ठेवण्यात आली आहे. हे मदत कार्य सकाळी आठ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजेपर्यंत असणार आहे. परिषदेस हेमंत कुलकर्णी, प्रशांत शेंडे, आदम मुल्लाणी, प्रेम सातपुते, आदेश कांबळे, अविनाश भांडवले आदी उपस्थित होते.