कोल्हापूर : कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी महापालिकेची यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आहे. शहरात कोरोनाचे नियम भंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसाठी पथक तैनात केली आहेत. मंगल कार्यालय, हॉटेलमध्ये जाऊन थेट कारवाई केली जात आहे. जनजागृतीसोबत कडक कारवाई, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. कोल्हापुरात कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून उपाययाेजना केल्या जात आहेत. मंगल कार्यालय, हॉटेलमध्ये सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर होत नसल्यास दंडात्मक कारवाई करण्यासाठी अग्निशमन विभागाचे पथक नियुक्ती केले असून त्यांच्याकडून कारवाईची मोहीम सुरू आहे.
चौकट
नागरिकांनी खबरदारी घ्यावी यासाठी जनजागृतीही केली जात आहे. केएमटीमध्ये ‘मास्क नाही, प्रवेश नाही’, ‘मास्कचा वापर केला नाही तर दंड’ अशी स्टीकर लावली जाणार आहेत. मास्क वापर करत नसणाऱ्यांवर कारवाईसाठी पाच पथके तैनात केली आहेत. प्रत्येक पथकात पोलिसांसह पाच कर्मचारी आहेत. सामाजिक संघटनेकडून जनजागृती केली जाणार आहे. आवश्यकतेनुसार कोरोना केअर सेंटर सुरू करू.
निखिल मोेरे, उपायुक्त, महापालिका
चौकट
पहिल्या टप्प्यात तीन कोरोना केअर सेंटर सुरू होणार
जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक ठिकाणी किमान दोन कोरोना केअर सेंटर सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सध्या महापालिकेच्या आयासोलेशन हॉस्पिटलमध्ये ७२ बेडचे कोरोना केअर सेंटर सुरू आहे. राजाेपाध्येनगर, कसबा बावडा पॅव्हेलियन आणि फुलेवाडी माने हॉल येथील कोरोना सेंटरमध्ये २०० बेडच्या क्षमतेची सर्व सुविधा उपलब्ध असून आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने हे सुरू केले जाणार आहेत.