कोल्हापूर : गेल्या चार वर्षांपासून सत्तेत असलेल्या मोदी सरकारने मूल्य आणि संविधानाधिष्ठित प्रसारमाध्यमांना धुडकावून लावत सोशल मीडियाची डिजिटल डेमोक्रसी अवलंबिली आहे. पत्रकारांची जागा आता प्रचारकांनी घेतली असून, ही टोळी मूळ प्रश्नांना बगल देण्यासाठी धर्मवादाची झुंडशाही पसरविते आणि हिंसाचार घडवून आणते. या आघातापुढे प्रसारमाध्यमे हतबल झाली आहेत. आता देश वाचविण्यासाठी सगळ्यांनी सावध व्हायची वेळ आली आहे, असे मत ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे यांनी रविवारी व्यक्त केले.शाहू स्मारक भवनात राजर्षी शाहू छत्रपती मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने आयोजित राजर्षी शाहू व्याख्यानमालेत त्यांनी ‘बदलती प्रसारमाध्यमे आणि जातीय हिंसाचार’ या विषयावर विवेचन केले. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. प्रकाश पवार होते. व्यासपीठावर ट्रस्टचे विश्वस्त प्रा. डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. अशोक चौसाळकर, प्रा. शिवाजी जाधव उपस्थित होते.डोळे म्हणाले, राष्ट्रवाद आणि देशभक्ती या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. राष्ट्रवादाचा जेव्हा उन्माद होतो तेव्हा तो उत्पात घडवून आणतो. सध्या देशात हेच सुरू आहे; कारण सत्ताधाऱ्यांना हिंदू राष्ट्र स्थापन करायचे आहे, राज्यघटना बदलायची आहे. त्यासाठी नागरिकांना चिथावणी देऊन झुंडीने हिंसा करण्यासाठी उद्युक्त केले जाते. अर्धसत्य बातम्या पसरविल्या जातात. वर्तमानपत्रे सत्य, पुरावा, घटना आणि लोकशाहीच्या मूल्यांचा आधार घेऊन बातम्या प्रसिद्ध करतात. ती ‘हाणा, मारा, तोडा, जाळा आणि फोडा’चे राजकारण करू शकत नाहीत; पण फेसबुक, टिष्ट्वटर, व्हॉट्स अॅपसारख्या सोशल मीडियाला आधारच नसल्याने हे सहजगत्या केले जाते.ते म्हणाले, आज देशातील शेतकरी, उद्योग-व्यापार, बेरोजगार, शिक्षण, महिला, आदिवासी या सगळ्याच घटकांमध्ये नाराजी आहे. त्यांना मूळ प्रश्नापासून विचलित करण्यासाठी हिंसाचाराचा कट रचला जातो. गरीबच गरिबांविरोधात लढताहेत. उजव्या विचारसरणीची सत्ता येत आहे. त्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला जातो. हा देश स्वातंत्र्य चळवळीतील मूल्ये आणि विचारांतून उभारला आहे. तो त्यांना मोडीत काढायचा आहे. हे लोकशाहीवरील मोठे संकट असून प्रत्येकाने सावध झाले पाहिजे. प्रा. प्रकाश पवार यांनी अध्यक्षीय समारोप केला.ट्रम्प आणि मोदी सख्खे भाऊडोळे म्हणाले, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी हे प्रस्थापित प्रसारमाध्यमांना धुडकावून लावण्यात एकमेकांचे सख्खे भाऊ आहेत. त्यांचे निर्णय ते वर्तमानपत्रांना सांगत नाहीत, तर फेसबुक, टिष्ट्वटर, व्हॉट्स अॅपवर प्रसिद्ध करतात. गेल्या चार वर्षांत त्यांनी एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. दुसरीकडे, त्यांचे सगळे मंत्री फक्त टिष्ट्वटरवरच काम करताना दिसतात; कारण मोदी त्यांना प्रत्यक्षात काही करूच देत नाहीत.
धर्मवादाच्या झुंडशाहीपुढे प्रसारमाध्यमे हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:47 AM