मलकापूर : मलकापूर (ता. शाहूवाडी) येथील ग्रामीण रुग्णालयाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वरिष्ठ कार्यालयाकडून मंजूर झाल्यानंतर विनात्रुटी पुरवणी बिले काढण्याच्या कार्यवाहीसाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना मलकापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आशितोष अरुण तराळ (वय ३८, सध्या रा. शासकीय वसाहत मलकापूर ग्रामीण रुग्णालय, मूळ गाव - रा. शिव-शंकर वसाहत एस के काॅलेजच्या पाठीमागे कुरुंदवाड ता. शिरोळ ) यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने सावळा रचून रंगेहात पकडले. याची नोंद शाहूवाडी पोलिसात केली आहे.
मलकापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आशितोष तराळ यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्तीनंतरच्या लाभांचा प्रस्ताव पुणे कार्यालयाकडून मंजूर होऊन आल्यानंतर पुढील कार्यवाही करणेसाठी, तक्रारदार यांची इतर प्रलंबित असलेली पुरवणी बिले विनात्रुटी पुढे पाठविण्यासाठी पाच हजार रुपये व वरिष्ठांच्या सेवानिवृत्तीच्या निरोप समारंभासाठी सात हजार रुपये अशी बारा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. मंगळवार दि . ३१ मे रोजी सेवानिवृत्तीच्या कामाचे पाच हजार रुपये मागणी करून ते घेऊन येण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले. नंतर लाचलुचपत प्रतिबंध पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांनी सापळा रचून तक्रारदारांकडून डॉ. तराळ यांना पाच हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले.
पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीव बंबरगेकर, पोलीस नाईक विकास माने, सुनील घोसाळकर, रूपेश माने, सुरज अपराध आदींसह ॲन्टिकरप्शन ब्युरो, कोल्हापूर यांनी या कारवाईसाठी परिश्रम घेतले.