कोव्हिड -19 चे काम काम नाकाराल तर आता थेट वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी काळ्या यादीत !
कोल्हापूर : नव्याने नियुक्त झालेले वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी कोव्हिड-19 प्रतिबंधात्मक कामे नाकारत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती रद्द करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे इथून पुढे त्यांना शासकीय सेवेत प्रवेश मिळणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिली.
जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणू प्रतिबंधक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, आरोग्य उपसंचालक डॉ. हेमंतकुमार बोरसे, जिल्हा शल्यचिकित्स डॉ. बी.सी. केम्पीपाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक आदींच्या उपस्थितीत आज बैठक झाली.
कोरोना प्रतिबंधक उपाययोजनेत वैद्यकीय अधिकारी तसेच इतर पॅरामेडिकल स्टाफ यांची मोठ्या प्रमाणात भरती करण्यात येत आहे. परंतु, असे निदर्शनास येत आहे, काहीजण अर्ज करून त्यांची निवड झाल्यानंतर तसेच प्रत्यक्ष काम करत आहेत, अशांना कोव्हिड-19 प्रतिबंधक कामासाठी आदेश दिल्यानंतर ते आदेश काहीजण नाकारत आहेत. असे आदेश वैद्यकीय अधिकारी किंवा कर्मचारी नाकारत असतील तर त्यांच्या नेमणुका तात्काळ रद्द करायच्या. त्यांच्याविरूध्द इथून पुढे कोणत्याही शासकीय सेवेत पुन्हा प्रवेश मिळणार नाही, असा शेरा मारून त्यांच्याविरूध्द काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ई-पासची सुविधा सद्या लॉकडाऊनचा कालावधी सुरू असल्याने काही शासकीय कर्मचाऱ्यांना आपापल्या कार्यालयात रूजू होण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. यामध्ये काही मंत्रालयातले, काही पुण्याचे तर काही इतर ठिकाणचे कर्मचारी आहेत. जे कर्मचारी लॉकडाऊनमुळे आपल्या गावाला आले होते व गावातच अडकून पडले आहेत. जिल्हा प्रशासनाने यासाठी सुविधा तयार केली आहे. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या kolhapur.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपल्याला कार्यालयात जाण्यासाठी पाससाठी अर्ज करावा. संबंधित तहसिलदारांकडून आपल्या मोबाईलवर ऑनलाईन पास प्राप्त होईल. सर्व शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कार्यालयामध्ये जाण्यासाठी अशा पध्दतीने संकेतस्थळावर जावून ई-पास मिळवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी केले.जिल्हा आपत्ती निधीसाठी ऑनलाईन मदतीची सोय जिल्हा प्रशासनामार्फत जिल्हा आपत्ती मदत निधीसाठी उघडण्यात आलेल्या खात्यामध्ये जिल्ह्यातील व इतर ठिकाणच्या ज्या-ज्या लोकांना या कोव्हिड-19 प्रतिबंधक उपाययोजनेमध्ये मदत द्यायची आहे अशा सर्व व्यक्तींसाठी ऑनलाईन पेमेंटची सुविधा करण्यात आली आहे. kolhapur.gov.in या संकेतस्थळावर वरील कोल्हापूर आपत्ती निवारण -पेमेंट गेट वे या पर्यायावर क्लिक करून ऑनलाईन पध्दतीने पध्दतीने मदत देवू शकतात. दात्यांनी अधिकाधिक मदत करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी केले आहे.