कोल्हापूर : लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांना मोफत वैद्यकीय सल्ला आणि मोफत औषधे वितरणाचा प्रारंभ भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती सोमवारी करण्यात आला.
या उपक्रमामध्ये गृह अलगीकरणातील रुग्णांना किंवा रुग्णांच्या नातेवाइकांना आयुर्वेदिक, होमिओपॅथिक व अलोपॅथी औषधांचे मोफत कीट देण्यात आले. यावेळी देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, अजित ठाणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आमदार पाटील म्हणाले, श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालयाचे आयुर्वेदिक व डॉ. मत्तीवाडे यांच्या होमिओपॅथी व अलोपॅथीक औषधांच्या १५०० रुपयांचे कीट देण्यात येणार आहे. वैद्यकीय सेवाही मोफत दिली जाणार आहे. दिवसातून दोन वेळा डॉक्टर रुग्णांशी, नातेवाइकांशी व्हिडिओ कॉलद्वारे बोलणार आहेत.
भाजप शहर कार्यालयात रुग्णांच्या नातेवाइकांना औषधांचे कीट वितरित करण्यात आले. यावेळी डॉ. अश्विनी माळकर, डॉ. हितेश गांधी, डॉ. सुयोग फराटे, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. सविता गांधी, डॉ. संग्राम मोरे उपस्थित होते.