कोल्हापूर : वस्तू व सेवाकर परिषदेने (जीएसटी कौन्सिल) कोरोना, म्युकरमायकोसिसवरील उपचारासाठी लागणारी काही औषधे करमुक्त केल्याने ती स्वस्त झाली आहेत. हँड सॅॅनिटायझर, ऑक्सिमीटर, टेम्परेचर गन आदी उपकरणांवरील जीएसटी हा पाच टक्के करण्यात आल्याने त्यांचेही दर कमी झाले आहेत. त्यामुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
कोरोना, म्युकरमायकोसिसवरील औषधे आणि उपचारासाठी लागणाऱ्या अन्य वैद्यकीय साधन सामग्री, उपकरणांवरील जीएसटीमध्ये कपात करण्याची मागणी राज्य सरकार, औषध विक्रेत्यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्याची दखल घेत जीएसटी कौन्सिलने शनिवारी काही औषधांना जीएसटीतून मुक्त केले, तर उर्वरित औषधे, उपकरणांवरील कर कमी केला. टोसिलिझुमॅॅब इंजेक्शन हे कोरोनावरील आणि ॲॅम्फोटेरिन-बी इंजेक्शन हे म्युकरमायकोसिसवरील औषध जीएसटीमधून मुक्त केले आहे. त्यावर पूर्वी पाच टक्के इतका जीएसटी होता. कोरोनावरील रेमडेसिविर इंजेक्शन आणि रक्तामध्ये होणाऱ्या गुठळ्यांना रोखणाऱ्या हिपॅॅरिन इंजेक्शन या औषधांवरील जीएसटी हा १२ टक्क्यांवरून ५ टक्के इतका करण्यात आला आहे. हँड सॅॅनिटायझर, टेम्परेचर गनवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून पाच टक्के, तर ऑक्सिमीटर, कोरोना टेस्टिंग किटवरील १८ टक्के जीएसटी हा पाच टक्के केला आहे. कोरोनावरील फॅॅव्हीफेरावेरच्या एका गोळीची किंमत शंभर रुपयांवरून ७० रुपये इतकी झाली आहे.
प्रतिक्रिया
कोरोना, म्युकरमायकोसिसवरील औषधे ही अत्यावश्यक औषधांमध्ये असल्याने त्यांच्यावरील जीएसटी कमी करण्याची मागणी राज्य सरकारसह औषध विक्रेत्यांनी केली होती. त्यावर जीएसटी कौन्सिलने कराचा दर कमी करण्याचा निर्णय शनिवारी जाहीर केला. कर कमी करून कोल्हापूरमध्ये या औषधे, वैद्यकीय उपकरणांची विक्री केली जाईल. त्याबाबत जिल्ह्यातील असोसिएशनचे सदस्य, औषध विक्रेत्यांना सूचना दिल्या आहेत. दर कमी झाल्याने रुग्ण, नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
-संजय शेटे, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशन
औषधे, उपकरणांचा दर
पूर्वीचा दर नवीन दर
टोसिलिझुमॅॅब ४०५६० ३८६२८
ॲॅम्फोटेरिन-बी ४२५० ४०४७
रेमडेसिविर ३००० २८२१
हिपॅॅरिन ३३९ ३१९
फॅॅव्हीफेरावेर टॅॅबलेट १०० ७०
हँड सॅॅनिटायझर (एक लिटर) ५०० ४४७
ऑक्सिमीटर १००० ९४०
टेम्परेचर गन १८०० १६११