प्रदीप शिंदे- कोल्हापूर प्रवासभाडे सवलतीच्या माध्यमातून समाजातील विविध सामाजिक घटकांना सामाजिक बांधीलकीच्या नात्याने एस. टी. महामंडळाकडून विविध प्रकारच्या एकूण ३५ सवलती देण्यात येतात. जिल्ह्यात एका वर्षात एक कोटी ९५ लाख ४० हजार ५५ लाभार्थ्यांनी या सवलतीचा लाभ घेतला. कोटीच्या घरातील प्रवाशांनी याचा फायदा घेतल्याने सवलतीची एस.टी. सुसाट असल्याचे चित्र सध्या कोल्हापूर विभागात पाहावयास मिळते.राज्य सरकारकडून शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्यसैनिक, क्षयग्रस्त, विविध पुरस्कार विजेते यांना सामाजिक बांधीलकीतून एस.टी.च्या प्रवासभाड्यात सवलत देण्यात आली आहे. कोणाला तिकिटाच्या पन्नास टक्के, तर कोणाला शंभर टक्के सवलत आहे. ही सवलतीची रक्कम राज्य सरकार एस. टी. महामंडळाला देत असते. जिल्ह्यात शासनाच्या विविध योजनांचे लाभार्थी मोठ्या प्रमाणात आहेत. एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ मधील लाभार्थी पाहता एस.टी.कडे सर्व घटकांचा ओढा वाढत असल्याचे चित्र पाहण्यास मिळते. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसचा मोठा आधारअहिल्याबाई होळकर योजना : इयत्ता ५ वी ते १० वी ग्रामीण भागातील मुलींना मोफत एस.टी. प्रवास. विद्यार्थी मासिक पास ६६.६७ टक्के सवलत. विद्यार्थी मोठ्या सुटीत मूळ गावी येणे किंवा आजारी आई-वडिलांना भेटावयास जाण्या-येण्यासाठी ५० टक्के सवलत. विद्यार्थ्यांना नैमित्तिक करार ५० टक्के. राज्य शासनाने पुरस्कृत केलेल्या खेळांमध्ये भाग घेतलेले खेळाडू ३३.३३ टक्के. शैक्षणिक स्पर्धांसाठी ५० टक्के. ज्येष्ठ नागरिक ५० टक्के, क्षयरोग ५० टक्के, कर्करोगी ५० टक्के, कुष्ठरोगी ७५ टक्के, अपंग व्यक्ती ७५ टक्के , अंध व्यक्ती ७५ टक्के, अंध व्यक्ती साथीदार ५० टक्के यांच्यासह अधिस्वीकृतीधारक पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे एक साथीदार, आदिवासी पुरस्कारप्राप्त व्यक्ती व एक साथीदार, दलितमित्र, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, शिवछत्रपती, दादोजी कोंडदेव, द्रोणाचार्य, अर्जुन पुरस्कारप्राप्त व्यक्ती, पंढरपूर आषाढी-कार्तिकी एकादशीला शासकीय पूजेचा मान मिळालेल्यांना १०० टक्के सवलत देण्यात येते.राज्य परिवहन महामंडळातर्फे विविध प्रकारच्या ३५ सवलती दिल्या जातात. याचा सर्वाधिक फायदा ग्रामीण भागातील माध्यमिक, उच्च माध्यमिकसह तांत्रिक शिक्षणच्या विद्यार्थ्यांना होतो. ज्येष्ठ नागरिक, अपंगांना एसटी बसचा प्रवास सोयीस्कर ठरत आहे. - पी. व्ही. पाऊसकर, विभागीय वाहतूक अधिकारी सर्वांत जास्त यांनी घेतला फायदा एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ या कालावधीत जिल्ह्यातील एक कोटी ५८ लाख ४९ हजार ५२८ ज्येष्ठ नागरिकांनी एस.टी. सवलतीचा फायदा घेतला. त्यांच्यापाठोपाठ १८ लाख ५८ हजार ३७ अपंग व्यक्तींनी लाभ घेतला; तर पाच लाख ३३ हजार ६०१ विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे.
मीना यांना पदभार घेण्यापासून रोखले
By admin | Published: June 10, 2015 12:07 AM