कोल्हापूर : अभिनेत्री मीनाकुमारीने आयुष्यातील अनेक कठीण प्रसंगांना मोठ्या धीराने सामोरे जात आपल्या अभिनयात कसलीही कसर जाणवू दिली नाही. मीनाकुमारी भारतीय चित्रपटसृष्टीला न सुटलेलं कोडं आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांनी केले.हृदयस्पर्श हौशी सांस्कृतिक व्यासपीठातर्फे मंगळवारी राजर्षी शाहू स्मारक भवन येथे ‘एक थी पाकिजा : अभिनेत्री मीनाकुमारीची शोकात्मक चरित्रगाथा आणि रूपेरी प्रवास’ या विषयावर मुक्तसंवादाचे आयोजन केले होते. याप्रसंगी ते बोलत होते.ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक भालकर म्हणाले, कलाकारांचे आत्मचरित्र नेहमी मृगजळासारखे असते. प्रत्येकजण त्यामधून कलाकारांच्या जीवनातील काही भावनेचा धागा पकडता येतो का, याचा शोध घेत असतो. पद्मिनी कापसे म्हणाल्या, सन १९५० ते १९७० हा काळ ‘भारतीय चित्रपटसृष्टीतील सुवर्णकाळ’ म्हणून ओळखला जातो. या काळात अनेक अभिनेत्री होऊन गेल्या. त्यापैकी एक मीनाकुमारी. तिच्या संपूर्ण चित्रपट कारकिर्दीवर प्रकाशझोत टाकला तर बालकलाकार ते चरित्र अभिनेत्री अशा भूमिका ८८ चित्रपटांतून करत तिने आपले अभिनयसम्राज्ञीपण सिद्ध केले. सूत्रसंचालन ‘वाचनकट्टा’चे संस्थापक युवराज कदम यांनी केले. स्वागत व प्रास्ताविक ‘हृदयस्पर्श’चे अध्यक्ष पद्माकर कापसे यांनी केले.मीनाकुमारीच्या आयुष्यावर आधारित दृक-श्राव्य, निवेदन व लाईव्ह गीते या स्वरूपातील ‘एक थी पाकिजा’ ट्रॅजेडी क्वीन स्व. मीनाकुमारी शोकात्मक चरित्रगाथा व रुपेरी प्रवास’ या कार्यक्रमाचे आयोजन उद्या, गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता केशवराव भोसले नाट्यगृह येथे करण्यात आले आहे. सर्वांना प्रवेश विनामूल्य असून, रसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘हृदयस्पर्श’च्यावतीने करण्यात आले आहे. सखी मंच सभासदांना मोफत पास ‘एक थी पाकिजा’ या कार्यक्रमाचे पास सखी मंच सभासद व त्यांच्या कुटुंबीयांना मिळणार असून, प्रत्येक सभासदाला दोन पास मिळतील. लोकमत कार्यालय, कोंडा ओळ येथून पासेस संपेपर्यंत दिले जातील.
मीनाकुमारी चित्रपटसृष्टीला न सुटलेलं कोडं
By admin | Published: March 30, 2016 12:35 AM