कोल्हापूर : आपल्या अभिनयाने अजरामर झालेल्या आणि शायरीमुळे रसिकांच्या मनात स्थान मिळविलेल्या स्व. मीनाकुमारी यांच्या ४४व्या पुण्यतिथीनिमित्त आज, गुरुवारी सायंकाळी ५.४५ वाजता केशवराव भोसले नाट्यगृह येथे लोकमत सखी मंच व हृदयस्पर्श या हौशी सांस्कृतिक व्यासपीठातर्फे ‘एक थी पाकिजा’ हा कार्यक्रम होत आहे. ट्रॅजेडी क्वीन, अभिनयसम्राज्ञी मीनाकुमारीची शोकात्मक चरित्रगाथा आणि रूपेरी प्रवास दृक-श्राव्य, निवेदन व लाईव्ह गाण्यांच्या कार्यक्रमातून रसिकांना अनुभवता येणार आहे. या कार्यक्रमाची संकल्पना-संहिता आणि निर्मिती पद्माकर कापसे यांची असून पद्मिनी कापसे यांचे सहकार्य त्यांना लाभले आहे, तसेच कीर्ती सुतार यांचे गायन, प्रतिथयश गायक प्रल्हाद पाटील यांचे निवेदन, विक्रांत पाटील यांचे संगीत संयोजन, तर मंदार पाटील यांनी या कार्यक्रमाचे संपूर्ण संकलन केले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रतिभासंपन्न अभिनेत्री मीनाकुमारी यांचा विलक्षण अभिनय, भावोत्कट चेहरा, आरस्पानी सौंदर्य आणि संवेदनशील कवयित्री असे व्यक्तिमत्त्व लाभलेल्या स्व. मीनाकुमारी आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. आजही तिची स्मृती चिरंतन राहिली आहे. गेली दहा वर्षे ‘हृदयस्पर्श’ या हौशी सांस्कृतिक व्यासपीठातर्फे कला-साहित्य-संगीत अशा सांस्कृतिक क्षेत्रातील चळवळीतून करवीरच्या कलेचा वारसा जपला आहे. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये रूची असणाऱ्या नव्या-जुन्या व उदयोन्मुख कलाकारांना त्यांच्या सुप्त-गुणांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. कलेचा संस्कार आणि संस्कारातून उमलणारा सांस्कृतिक आविष्कार हीच मध्यवर्ती संकल्पना ‘हृदयस्पर्श’ची आहे. कोणताही व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता सांस्कृतिक आनंदाच्या देवाण-घेवाणीतून हृदयस्पर्श परिवार निर्माण झाला आहे. ‘हृदयस्पर्श’च्या शिरपेचामध्ये आणखीन एक मानाचा तुरा खोवला जात आहे. तब्बल दोन वर्षांनंतर अत्यंत सुशोभित आणि आलिशान अशा सजलेल्या केशवराव भोसले नाट्यगृह येथे ‘एक थी पाकिजा...’ हा पहिला कार्यक्रम सादर करण्याचा मानही या कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘हृदयस्पर्श’ला मिळाला आहे. (प्रतिनिधी)कार्यक्रमाचे पास संपले सभागृहाची आसन क्षमता लक्षात घेता कार्यक्रमास पासशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. कार्यक्रमाचे पासेस संपले आहेत.
मीनाकुमारीचा जीवनप्रवास आज उलगडणार
By admin | Published: March 31, 2016 12:27 AM