कोल्हापूर : कॉँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली, एबी फॉर्म हातात पडला आणि चंद्रकांत जाधव यांच्या समर्थकांनी प्रचाराला मिळणारा कमी कालावधी लक्षात घेता, रात्रीचा दिवस करावा लागणार, याची पक्की खूणगाठ बांधून स्वत:ला प्रचारकार्यात वाहून घेतले. ‘मीपण अण्णा’ ही टॅगलाईन जोडून जाधवांचे अष्टप्रधान मंडळ जोरात कामाला लागले आणि विजय पदरात पाडूनच घरी परतले. विजय सहजसोपा नव्हता; तरीही सर्वांनी कमी वेळेत केलेल्या चांगल्या कामाचे फळ चंद्रकांत जाधव यांना आमदारकीच्या रूपाने मिळाले.
फारसं राजकीय वलय नाही, राजकीय वारसाही नाही, अशा परिस्थितीत कमी वेळेत आणि कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त कार्यकर्त्यांच्या जोरावर निवडणूक कशी जिंकायची, याचा एक आदर्श चंद्रकांत जाधव यांनी घालून दिला. जसे जाधवांची महत्त्वाकांक्षा विजयासाठी कारणीभूत आहे, तसेच कार्यकर्त्यांनी घेतलेले परिश्रमदेखील कारणीभूत आहेत.
जाधवांची यंत्रणा त्यांना ३ आॅक्टोबरला कॉँग्रेसची उमेदवारी मिळताच कामाला लागली. एक हजाराहून अधिक सक्रिय कार्यकर्त्यांचे जाळे त्यांच्यासाठी काम करीत होते. प्रचारात कुठेही कमतरता, उणिवा राहू नयेत म्हणून आठ पथके त्यांनी निर्माण केली. आशिष पोवार, अजित पोवार, प्रमोद बोंडगे, देवेंद्र रेडेकर, वासीम, अनिकेत सावंत, युवराज कुरणे, नरेंद्र वायचळ असे आठ प्रमुख कार्यकर्ते अष्टप्रधान मंडळात होते. त्यांच्याकडे एकेका पथकाची जबाबदारी सोपविण्यात आली.
चेंबर आॅफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने, विद्यमान अध्यक्ष संजय शेटे, विज्ञान मुंडे, रमेश पुरेकर, श्रीकांत माने, संभाजी पोवार, शिवाजीराव पोवार, युवराज उलपे, उदय दुधाणे,राजू साठे, दीपक चोरगे, योगेश कुलकर्णी, संदीप पाटील, अमित हुक्केरीकर अशी मंडळी थिंक टॅँक म्हणून काम करीत होती. १३ दिवसांच्या प्रचाराचे नियोजन यांसह अन्य अनेक जोडण्या लावण्यात हा थिंक टॅँक काम करीत होता.
दिवसभराचा प्रचार संपल्यानंतर प्रमुख कार्यकर्ते रात्री १२ वाजल्यानंतर एकत्र जमायचे. दिवसभराचा आढावा आणि उद्याचे नियोजन यांवर चर्चा करायचे आणि सकाळी सहा वाजल्यापासून पुन्हा कामाला लागायचे. या काळात सर्वच कार्यकर्त्यांनी कुटुंबाची पर्वा केली नाही. केवळ विजय मिळवायचा, याच ध्यासाने ‘मीपण अण्णा’ असे समजून ते काम करीत राहिले.प्रचाराकरिता मिळालेला कमी कालावधी आमच्यासमोर एक आव्हान होते; परंतु कोणतीही गोष्ट नियोजनपूर्वक केली की सोपी जाते, यावर आमचा विश्वास होता. म्हणून आम्ही नियोजन आणि वेळेचे महत्त्व ओळखून प्रचार केला.- आनंद माने, माजी अध्यक्षचेंबर आॅफ कॉमर्स---------------------- भारत