इचलकरंजी : शेतकºयांना जमिनीत गाडा आणि मगच रेल्वेचा सर्व्हे करा, अशी कडक भूमिका रेल्वे विरोधी कृती समितीच्यावतीने शेतकºयांनी मांडली. त्यामुळे सर्व्हेसाठी प्रांताधिकारी व पोलीस अधिकारी यांनी बोलावलेली रेल्वे अधिकारी व शेतकरी यांची बैठक निष्फळ ठरली. दरम्यान, शेतकºयांकडून होणाºया विरोधाबाबत प्रशासन व रेल्वे अधिकारी वरिष्ठ पातळीवर कळविणार असून, त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. त्यातूनही रेल्वे प्रशासनाच्यावतीने सर्व्हे करण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी केल्यास त्यानुसार कार्यवाही केली जाईल, असेही पोलीस व प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
इचलकरंजीला रेल्वे येण्यासाठी हातकणंगले ते कबनूर या आठ किलोमीटरच्या अंतराच्या सर्व्हेला होणारा विरोध चर्चेतून सोडविण्यासाठी प्रांत कार्यालयात शनिवारी कृती समितीचे पदाधिकारी तसेच रेल्वे मार्गावर येणाºया गावातील प्रमुख पदाधिकारी व रेल्वे खात्यातील अधिकारी यांची संयुक्त बैठक शनिवारी झाली. यात सामोपचाराने मार्ग काढण्यासाठी प्रांताधिकारी समीर शिंगटे व पोलीस प्रशासनाच्यावतीने अप्पर श्रीनिवास घाडगे, पोलीस निरीक्षक सतीश पोवार यांनी प्रयत्न केले. रेल्वेच्यावतीने वरिष्ठ खंड अभियंता, मध्य रेल पुणे दीपक आर्या व मिरज विभाग पुणे मंडल, मध्य रेल्वेचे सहायक कार्यकारी अभियंता एस. के. जैन यांनी सर्व्हेसंदर्भात माहिती दिली. तसेच शेतकºयांच्या लेखी परवानगीशिवाय जमीन घेतली जाणार नाही. त्यामुळे सर्व्हेसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी केली.
कृती समितीच्यावतीने अध्यक्ष प्रमोद पाटील, जयकुमार कोले, पी. एम. पाटील, सरपंच खलिदा फकीर, चंदूरचे सरपंच मारुती जाधव, नागेश पुजारी, विजय पाटील यांच्यासह कुंभोज, कोरोची व हातकणंगलेतील प्रमुख पदाधिकाºयांनी सर्व्हेसाठी विरोध दर्शविला. नियमानुसार या सर्व गावांनी गावसभांमध्ये या भागातून रेल्वे येण्यास तसेच या संदर्भातील सर्व्हेे होण्यास विरोध असल्याचा ठराव करून संबंधित विभागाला पाठविला आहे. त्यामुळे या सर्व्हेसाठी विरोध असून, तो रेल्वेच्या अधिकाºयांनी व प्रशासनाने आपापल्या विभागाला कळवावा. तसेच इचलकरंजीला रेल्वे पाहिजेच असल्यास यापेक्षा जवळचा असणारा तारदाळ अथवा त्या परिसरातून नवीन मार्ग निवडावा अशी भूमिका मांडली.
पोलीस दलाने याबाबत विरोधी कृती समितीने रेल्वे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत आपले म्हणणे वरिष्ठ स्तरावर पोहोचवून मार्ग काढावा, अन्यथा रेल्वे प्रशासनाच्यावतीने सर्व्हे करण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी केल्यास त्यानुसार कार्यवाही केली जाईल. त्यावेळी विरोधाची भूमिका घेऊ नये, असे स्पष्ट केले. यावेळी पोलीस उपअधीक्षक विनायक नरळे, निरीक्षक मनोहर रानमाळे, संजीव झाडे, आदी उपस्थित होते.इचलकरंजी प्रांत कार्यालयात रेल्वे विरोधी कृती समितीच्यावतीने पी. एम. पाटील पाटील यांनी बाजू मांडली. यावेळी कृती समितीचे सदस्य व प्रांताधिकारी समीर शिंगटे व अन्य अधिकारी उपस्थित होते.