कोल्हापूर : लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या अलौकीक अशा कार्याची साक्ष ठरणाऱ्या शाहू मिलच्या जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व जन्मशताब्दी स्थळाचे रेंगाळलेले काम त्वरीत पूर्ण करावे. या मागणीसाठी राजर्षी शाहू -आंबेडकर-फुले लोकमंचतर्फे शुक्रवारी निदर्शने करण्यात आली.कोल्हापूरकरांचे राजर्षींवर किती प्रेम असल्याने नेमके हेच हेरुन यापुर्वीच्या व आताच्या सरकारमधील सत्ताधाऱ्यांनी घोषणांची खैरात केली होती. मात्र, त्याची अंमलबजावणी अद्यापही केलेली नाही. शाहू मिलच्या २८ एकरवर महापालिकेने बनविलेल्या १६८ कोटींचा आराखडयास मंजूरी मिळाल्यानंतरही जितका आनंद जनतेला झालेला आता ओसरु लागला आहे.
राजर्षींनी स्थापन केलेल्या संस्थांनीही शंभर वर्षे पूर्ण केली आहेत. मात्र, अजूनही वस्त्रोद्योग महामंडळ ही जागा महापालिकेकडे हस्तांतर करण्यास राजी नाही. तरी हे काम त्वरीत पूर्ण करावे. याकरीता शुक्रवारी शाहू मिलसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.
यावेळी फिरोजखान उस्ताद, सुहास सामानगडकर, किसन कल्याणकर, जयकुमार शिंदे, बाबुुराव कदम, उमेश तडखे, निशिकांत सरनाईक, संजय आवळे, महेश साळोखे, संभाजीराव जगदाळे, रफिक मुल्ला, कादरभाई मलबारी, अशोक बुरसे, मानसिंग सावंत, शेखर कवाळे आदी उपस्थित होते.