कोल्हापूर : शिरोळमधील राजू शेट्टी यांचा रस्त्याकडेला असलेला बंगला. शुक्रवारी दुपारी एकचा सुमार. दारात राज्य राखील पोलीस दलाची व्हॅन तैनात असलेली. आता नवीन बंगल्याच्या बेसमेंटलाच राजू शेट्टी शांतपणे बसून राहिलेले. समोर कार्यकर्त्यांची गर्दी. भेटायला येणाऱ्यांच्या प्रत्येकाच्या तोंडी एकच वाक्य.. हजार मतांनी का असेना तुम्हीच निवडून येणार, असे आम्हाला वाटायचे; परंतु असं कसं घडलं कळलंच नाही. शेट्टी यांच्या पराभवाचा धक्का प्रत्येकाच्या चेहºयावर दाटलेला.
शेट्टी यांचे घर म्हणजे गेली २0 वर्षे शेतकरी आंदोलनाच्या चळवळीचे केंद्रच; त्यामुळे तिथे कायमच सामान्य जनतेचे विविध प्रश्न घेऊन राबता; परंतु शुक्रवारी मात्र प्रश्नांपेक्षा लोक आपल्या नेत्याला आधार द्यायला आलेले. शेट्टी त्यांना भेटतात. खासदारकीवर काय माझे पोटं चालत नव्हते. चळवळीला त्याचे बळ मिळायचे. तुमचेच प्रश्न सोडविण्यासाठी ताकद मिळायची आणि शेतकºयांच्या चळवळीला त्यामुळे राजमान्यता मिळायची, म्हणून निवडणूक लढविली. त्यात यावेळेला अपयश आले; त्यामुळे खचून जाऊन कसं चालेल. दोन दिवस लोक भेटायला येतात म्हणून घरी बसलो आहे. त्यानंतर मतदारसंघातील जनतेचा आभार दौरा काढून दुष्काळाच्या प्रश्नांवर कोल्हापूर ते पंढरपूर पायी दिंडी काढण्याचा विचार सुरूअसल्याचे ते सांगतात.
इचलकरंजीमध्ये २५ हजारांपर्यंत कमी मते मिळतील, असा अंदाज त्यांना आला होता; परंतु हे मताधिक्य अन्य मतदारसंघात भरून निघेल असे वाटायचे; त्यामुळे विजयाची खात्री होती; परंतु तसे घडले नाही. गेल्या निवडणुकीत मोदी यांनी किमान हमीभाव दुप्पट करणार असे आश्वासन दिले होते, या निवडणुकीत तसे कोणतेही आश्वासन दिले नाही. किंबहुना त्यांनी काय करणार हेच सांगितले नाही, तरीही लाखोंच्या मतांनी लोकांनी भाजपचे खासदार निवडून दिले. दोन्ही निवडणुकीत शेट्टी यांच्या जातीचा मुद्दा निघाला; परंतु लोकांनी त्यास दाद दिली नव्हती; त्यामुळे या निवडणुकीतही एक-दोन मतदारसंघांत त्याचा प्रभाव दिसेल; परंतु शेतकरी जातिपातीमध्ये अडकणार नाहीत, असा त्यांना विश्वास होता; परंतु तसे घडले नाही. खुद्द शिरोळमध्ये स्वत:च्या गावात ते दोन हजार मतांनी मागे राहिले.
मतदानानंतर दोन दिवसांनी त्यांना असाही अनुभव आला. सरकारी नोकरदार असलेले पती-पत्नी त्यांना भेटायला आले. त्यांचे टपाली मतदान पाठवायचे होते. त्यांच्यासमोरच ते मतदान त्यांनी केले. जाताना शेट्टी यांच्या हातात १0 हजार रुपये घालू लागले. शेट्टी यांनी त्यास नकार दिला. आता माझी निवडणूक झाली आहे; त्यामुळे पैसे नकोत, असे ते म्हणाले; परंतु साहेब हे तुमच्यासाठीच काढून ठेवले आहेत म्हणून त्यांनी पैसे हातात कोंबले. सामान्य जनतेची ही बांधीलकी व आताचा ९६ हजारांचा पराभव याचा मेळ त्यांनाही घालता येत नव्हता. येणाºया प्रत्येकाला ते धीर देत होते. पराभव झाला म्हणून गप्प बसणारा मी नाही. लढूया पुन्हा संघर्ष करूया, असा आशावाद ते जागवितात; परंतु भेटायला आलेल्या शेतकºयाचे डोळे मात्र पाण्याने डबडबलेले असतात.