कोल्हापूर : जिल्हा परिषदेकडील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांबाबत चर्चा करण्यासाठी सोमवारी (२२ आॅक्टोबर) बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या कार्यालयात दुपारी १२ वाजता होणाऱ्या या बैठकीसाठी दोन्ही कास्ट्राईब संघटनेला बोलावण्यात आले आहे.
दरम्यान, या बैठकीपूर्वी संघटनेकडून प्राप्त प्रश्नांबाबत केलेली कार्यवाही व मागील सभेच्या इतिवृत्तावर केलेल्या कार्यवाहीच्या माहितीच्या पाच प्रती शनिवारी दुपारी तीनपर्यंत सामान्य प्रशासन विभागाकडे सादर करण्याबाबतच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.मागासवर्गीयांना बढतीत आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने आपल्या अखत्यारीत घ्यावा, असा निर्णय नुकताच सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. राज्य सरकारने मागासवर्गीय बढती पदोन्नतीची स्थिती जैसे थे ठेवून खुल्या प्रवर्गातील जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतही बढतीत आरक्षण मिळणाऱ्या जवळपास १५ ते १६ जागा असल्याने या जागांचा निर्णय काय घ्यायचा यासंदर्भात चर्चा होणे अपेक्षित आहे; त्यासाठी कास्ट्राईब कर्मचारी संघटनेशी चर्चा करून पुढील दिशा ठरवावी, असे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांनी सुचित केले होते. त्यानुसार सोमवारी यासंदर्भात बैठक होत आहे.