कोल्हापूर: अवसायनात गेलेल्या भूदरगड नागरी सहकारी पतसंस्थेच्या कर्जदारांची बैठक २ सप्टेंबरला कोल्हापुरात बोलावण्यात आली आहे. आमदार प्रकाश आबीटकर यांनी बोलावलेली ही बैठक दुपारी १ वाजता शासकीय विश्रामगृहावर होणार आहे. विभागीय सहनिबंधक देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
पतसंस्थेकडून चुकीच्या व नियमबाह्य पद्धतीने कर्ज वसुलीत तक्रारी आल्याने आमदार आबीटकर यांनी बैठक बोलावली असल्याचे स्पष्ट केले आहे. बँक अवसायनात गेली असलीतरी सध्याच्या अवसायकांकडून थकबाकीदारांना कर्ज वसुलीच्या नोटिसा लागू करण्यात आल्या आहेत. यावरून सध्या कर्जदार हवालदिल झाले आहेत. कर्जदार व जामीनदार या दोघांनाही नोटिसा लागू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर या बैठकीत वसुलीच्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय होणार असल्याने संबंधितांनी बैठकीला उपस्थित राहावे, असेही आमदार आबीटकर यांनी म्हटले आहे.