येथील टाऊन हॉल परिसरातील नर्सरी गार्डनमधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळास खासदार संभाजीराजे यांनी अभिवादन केले. त्यानंतर ते बोलत होते.
ते म्हणाले, गायकवाड समितीचा अहवाल फेटाळून लावत सर्वाेच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले. त्यानंतर समाजात असंतोष आहे; पण रस्त्यावर उतरून तो व्यक्त करण्याची परिस्थिती सध्या कोरोनामुळे नाही. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेऊन समाजाच्या हितासाठी ठोस निर्णय घेण्याची गरज् आहे. न्यायालयाच्या चौकटीतून आरक्षण देता येते की नाही, येत नसेल तर इतर मार्गातून समाजाला काय देणार हे स्पष्ट केले पाहिजे. यासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्वच पक्षांतील आमदार, खासदारांनी पुढाकार घेतला पाहिजे. मराठा आरक्षण प्रश्नांतून मार्ग काढण्यासाठी माझाही अभ्यास झाला आहे. राज्यभर फिरून विविध तज्ज्ञांची मते जाणून घेत आहे. विदर्भ, खानदेश आणि मराष्ट्राच्या विविध जिल्ह्याला भेटून समाजाच्या प्रुमख नेत्यांना भेटत आहे. या दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोन आला होता. आरक्षणप्रश्नी चर्चा करण्यासाठी भेटण्यासाठी त्यांनी विनंती केली; पण मी राज्याच्या दौऱ्यावर असल्याचे सांगितले. राज्याचा दौरा पूर्ण झाल्यानंतर २७ आणि २८ मे रोजी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत बैठक होईल. मराठा समाजासोबत ठाम पणे राहून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. अभिवादन करताना गवळी समाजाचे माजी अध्यक्ष गोरखनाथ गवळी, परीट समाजाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष वसंतराव वठारकर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष शहाजी कांबळे, सतीश कोरवी, धनंजय सावंत, दिगंबर फराकटे, नागेश घोरपडे यांच्यासह विविध समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट
आंदोलन हा एक भाग
मराठा समाजाच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी जगाने नोंद घ्यावी, असे ५८ मोर्चे निघाले. रस्त्यावर उतरून शांततने लक्ष वेधले. आता कोरोनाची महामारी आहे. त्यामुळे पुन्हा आरक्षणासाठी समाजाने रस्त्यावर उतरवून आंदोलन करणे बरोबर नाही. आरक्षणप्रश्नी लक्ष वेधण्यासाठी आंदोलन हा एक भाग असला तरी संयमाने न्याय मिळविणे समाजाच्या हिताचे आहे, असेही खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.