कोल्हापूर : शिवसेना सीमाभागातील लोकांबरोबर आहे. त्यातील एक पाऊल म्हणून आम्ही सीमाभागात एक शैक्षणिक संकुल सुरू करणार आहे. या संकुलाची बृहत आराखड्यामध्ये नोंद करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. ३) बैठक आयोजित केली असल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी रविवारी सांगितले.कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या शैक्षणिक संकुलाला शासकीय जागा उपलब्ध करून देण्याबाबतचे नियोजन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी पुढील वर्षापासून अभ्यासक्रम सुरू करण्याच्या निर्णयास मूर्त रूप आले आहे.
विद्यापीठांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रत्येक विद्यापीठात माझ्या विभागातील अधिकारी सोबत घेऊन बैठक घेणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात उच्च शिक्षण संचालक हे दर महिन्याला बैठक घेतील. त्यामुळे प्राध्यापक, कर्मचारी यांना कमीत कमीवेळा मुंबईला जावे लागेल. शिवाजी विद्यापीठातील एका तक्रार निवारण समितीचा अहवाल माझ्याकडे आला आहे. दुसऱ्या समितीचा अहवाल एक महिन्यात सादर करण्यासाठी कुलगुरूंना मुदत दिली असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.काळया फिती लावून निषेधदरम्यान, सीमाभागातील मराठी भाषिकांवर अन्याय करणाऱ्या कर्नाटक सरकार आणि उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचा शिवसैनिकांनी काळया फिती बांधून निषेध केला. शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी त्यांच्या मनोगतातून कर्नाटकचा धिक्कार केला.