कोल्हापूर : कोरोनानंतर शासनाने सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून नाट्यप्रयोगांच्या सादरीकरणाला परवानगी दिली आहे. सध्याच्या परिस्थितीत नाट्य व्यावसायिकांसमोरील अडचणींचा मागोवा घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी उद्या, सोमवारी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
गायन समाज देवल क्लबच्या भांडारकर दालनात सायंकाळी सहा वाजता रंगकर्मी विद्यासागर अध्यापक यांच्या उपस्थितीत हा मेळावा होईल. केशवराव भोसले नाट्यगृह रंगकर्मी व नाट्यरसिकांसाठी ५० टक्के आसन क्षमता व नियम पाळून सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरणासाठी खुले झाले आहे. मात्र हे करताना स्थानिक नाट्यसंस्थांना अडचणी येणार आहेत. शिवाय नाट्यगृहाचे भाडे परवडणारे नाही, याबाबत मेळाव्यात चर्चा होणार असून नाट्य व्यावसायिकांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष आनंद कुलकर्णी, उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर व प्रमुख कार्यवाह गिरीश महाजन यांनी केले आहे.
--
इंदुमती गणेश